Nana Patole targeted Devendra Fadnavis over Vinod Tawde money distribution
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. काल (दि.20) राज्यामध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सरासरी 65.11 टक्के मतदान झाले असल्याचे सांगितले. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. यंदाची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. तसेच राज्यामध्ये पुढचे सरकार कोणाचे येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र निवडणुकीच्या एक दिवस आधी मात्र भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यांच्याजवळ रोकड सापडली देखील यामुळे मोठा गदारोळ झाला. यावरुन आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल. मतदान झाल्यानंतर जे कौल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा विजयाचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे नाना पटोले यांनी विनोद तावडे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले की, “भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले. पाच वाजल्यानंतर त्यांना राहता येत नाही. ते म्हणतात मी चिठ्ठी वाटायला गेलो होतो. ही बाब हास्यास्पद आहे. किती खोटं बोलणार?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांचे पीए असणारे वानखेडे हे आर्वीमधून उभे आहेत. त्यांच्या मतदारसंघात दारुबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारु सापडली. वर्धा दारुबंदीचा जिल्हा आहे. दारु आणि पैसा यांचं वाटप करुन हे नोट जिहाद करु इच्छितात का? भाजपाकडून व्होट जिहादचा नारा दिला जातो. खरंतर मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केलं की भाजपाला मतदान करणार, त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचं का? काय चाललं आहे हे महाराष्ट्रात? ज्यांना मतदान करायचं आहे त्यांचा तो अधिकार आहे,” असा घणाघात नाना पटोले यांनी केला. व्होट जिहादवरुन टिप्पणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला.