Navneet Rana's first reaction after the rada in Amravati
अमरावती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आला असून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अमरावतीतील दर्यापूर येथील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत मोठा राडा झाला. यावेळी सभेमध्ये, काहीजणांनी थेट खुर्च्या भिरकावत मोठी तोडफोड केली. या गोंधळात हल्लेखोरांनी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावर आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सभेमध्ये घडलेल्या प्रकरणावर नवनीत राणा म्हणाल्या की, “ज्या गावात हा प्रकार घडला, ते गाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांचं आहे. आधी व्यासपीठावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही सभेसाठी व्यासपीठ उभं केलं होतं. मात्र, त्यानंतर त्या सभेला मला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. त्यांना बघून शिट्या मारत होते. अशा पद्धतीचा व्यवहार त्यांनी केला. आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत, हे काल स्पष्ट दिसलं. पण ते विसरले आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहोत. बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उभं राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते, मी त्यांची मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात आहे” असा घणाघात नवनीत राणा यांनी केला आहे.
एक हैं तो सेफ हैं ! भाजपच्या नाऱ्याचा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी घेतला खरपूस समाचार
अल्ला हू अकबरचे नारे
पुढे ते म्हणाले की, “कालच्या सभेत जवळपास 200 ते 250 अपंग लोक बसलेले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. एवढ्या लांबून देखील अल्ला हू अकबरचे नारे ऐकू येत होते. त्यावेळी त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते, ते ऐकत होते. सभा संपल्यानंतर मी लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. तरीही मी म्हटलं की शांतता ठेवा. पण त्याचवेळी लगेच काहींनी खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर आमच्या काही लोकांनी मला गाडीत बसवलं. मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता” असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया
खासदार अनिल बोंडे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेमध्ये गोंधळ घातलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “नवनीत राणा यांच्या बाबतीत झालेली घटना अतिशय चीड आणणारी आणि संताप जनक आहे. निषेधाच्या करण्या पलीकडची ही घटना आहे. या समाज कंटकांनी, या महाविकास आघाडीच्या चामच्यांनी, या धर्मांध लोकांनी लक्षात ठेवायचं आहे की बाकीच्या लोकांनी जर संयम सोडला असता तर ते वाचले नसते. पोलिसांना सांगतो ताबडतोब सीसीटीव्ही व्हिडिओ वरून कॅमेरचे्या व्हिडिओवरून त्या लोकांना अटक करा. आमचे लोक सर्व कार्यकर्त्यांसोबत जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आहे आणि मला माहित आहे संपूर्ण जनतेला या गोष्टीची चीड आली आहे. नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीत केलेले अश्लिल चाळे हे त्याच लोकांचे होते,” अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे.