कराड विमानतळावर ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बॅग्स तपासणी हा मुद्दा चांगलाच तापला आहे. यवतमाळमधील वणी येथे उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी केल्यानंतर हा मुद्दा तापला. मात्र सध्या ठाकरेंच्या मागचे बॅग्स तपासणीचे सत्र संपताना दिसत नाहीये. कारण कराड विमानतळावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी करण्यात आली आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद उर्फ भानुप्रताप कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बॅगा, साहित्याची रविवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानातील पिशवी उघडून पाहण्यात आली. दरम्यान, नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साहित्याची देखील तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाहता उद्धव ठाकरे यांनी शाब्बास अधिकाऱ्यांनो… बॅगा तपासताय, मोदी, शहांची बॅग तपासली का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची रविवारी पाटण येथील मल्हारपेठमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी ठाकरे सकाळी कराड विमानतळावर आपल्या विमानाने उतरले. ठाकरेंचा दौरा नियोजित असल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक विमानतळावर तळ ठोकून होते. दुपारी विमानाने उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची, पिशव्यांची तपासणी करत असताना अधिकाऱ्यांना त्यात काळ्या रंगाचा गॉगल आढळून आला.
हेही वाचा: काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…! फडणवीस अन् गडकरींची बॅग चेकिंग; विरोधकांना सुनावले खडेबोल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक महिना बाकी राहिला आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाकडून जागोजागी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच नेत्यांच्या बॅगची व गाड्यांची तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅगची दोन वेळा तपासणी करण्यात आली. वणी येथे बॅग तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बॅग तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली. तसेच स्वतः व्हिडिओ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला देखील लगावला होता. त्याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या देखील बॅगाची तपासणी करण्यात आली. यानंतर आता सत्ताधारी भाजप नेत्यांची देखील तपासणी घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.