Sada Sarvankar
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात असे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात अनेक इच्छुकांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या आरपीआयने भाजपच्या विरोधात भूमिका घेत सदा सरवणकर यांना पाठिंबा दिला आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आली असून, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी निकाल हाती येणार असून यामुळे राजकारण रंगले आहे. मात्र, एक मतदारसंघामुळे चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत. पण त्यांना पाठिंबा देण्यावरुन महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. आता यावरुन शिंदे गटाचे माहिम मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे.
माहीमची जागा शिवसेनेला
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना मनसेकडून माहिम मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला आहे. शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र, भाजपकडून अमित ठाकरे यांना महायुतीने पूर्ण पाठिंबा देण्याची मागणी केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा
राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या पुत्राला विधानसभा निवडणुकीमध्ये बिनविरोध पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
नवाब मलिक यांनाही आरपीआयचा विरोध
मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांना भाजपाच्या पाठोपाठ आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट एकाकी पडला आहे. भाजपचा विरोध डावलून राष्ट्रवादी अजित पवार गटाने मानखुर्द-शिवाजीनगर दिली आहे. भाजपाने मलिक यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.