भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (फोटो- टीम नवराष्ट्र)
पंढरपूर/शेखर गोतसुर्वे: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सायंकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची त्यांच्या पंढरपुरातील तुळशी वृंदावन शेजारील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेत असताना भाजपाकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आ. समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यादरम्यान, पंढरपुरात असलेल्या आ. समाधान आवताडे यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व पांडुरंग परिवारातील प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेतल्याने भाजपाकडून परिचारक व आ. आवताडे यांच्यात समेट घडविण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारीसाठी आ. समाधान आवताडे यांचे नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात याबाबतचे सुतोवाच केले होते. यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक काय भूमिका घेणार? अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार का? याबाबत चर्चा सुरू होत्या. परिचारक यांनी मतदारसंघात आपला एक दौराही पूर्ण केला होता. यादरम्यान काही ठिकाणी तुतारी हाती घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे समोर आले होते. यामुळे परिचारक भाजपासोबत राहणार की अपक्ष लढणार? अशी चर्चा सुरू झाली होती. यामुळे भाजपाकडून वरिष्ठ पातळीवर् सुत्रे हलवित शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाचारण करण्यात आल्याचे दिसून आले.
परिचारक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शहाजी पवार, उमेश परिचारक, रोहन परिचारक, सतीश मुळे, दिलीप घाडगे, दिनकर मोरे, राजूबापू गावडे, कैलास खुळे, हरिष गायकवाड, सुभाष माने, रा.पा. कटेकर, गणेश अधटराव, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण शिरसट, अनिल अभंगराव, भास्कर कसगावडे, संतोष घोडके, लक्ष्मण धनवडे, संग्राम अभ्यंकर, धर्मराज घोडके आदी उपस्थित होते.