Shinde group leader Uday Samant targets mahavikas aaghadi for Maharashtra cm
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. मात्र एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील महायुतीने अद्याप सरकार स्थापनेचे दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा देखील राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्त केला आहे. मात्र महायुतीमध्ये पुढचे मुख्यमंत्री कोण याचा गुंता सुटलेला नाही. यावर महाविकास आघाडीने जोरदार टीका केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महायुतीने अद्याप मुख्यमंत्री कोण हे जाहीर केले नसून सत्तास्थापनेचा दावा देखील केलेला नाही. पूर्ण बहुमत असताना देखील पदांवरुन निर्णय होत नसल्यामुळे सरकार स्थापनेचे घोंडगे तसेच भिजत राहिले आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप कधीच शब्द पाळत नाही. 2019मध्ये आमच्यासोबत देखील हेच केलं. गरज सरो वैद्य मरो आणि वापरा व फेकून द्या, हीच भाजपची नियत असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच महायुतीमध्ये तिन्ही पक्ष पदांवरुन एकमेकांच्या तंगड्यात तंगड घालून छातीवर बसले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
यावरुन शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी निशाणा साधला आहे. उदय सामंत म्हणाले की, “ज्यांना विरोधीपक्ष नेता बनवता येत नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदावर बोलू नये, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेता कोण असेल हे पुढच्या 48 तासात महाविकास आघाडीने सांगावं,” असे थेट आव्हान उदय सामंत यांनी दिले आहे.
पुढे उदय सामंत यांनी राज्यामध्ये विरोधक न निवडून आल्यामुळे निशाणा साधला. सामंत म्हणाले की, “विरोधक राहिले कुठे? विरोधक राहिले पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भातील ज्या शंका महाराष्ट्राच्या मनात होत्या त्याबद्दल स्वतः एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ट्वीट करून यासंदर्भातील शंका दूर केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालं आहे. महाराष्ट्रातील जनतेने 230 पेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणली आहे. महायुतीचे तीनही नेते परिपक्व आहे. ते तिघंही एकत्र बसतील आणि लवकर निर्णय घेतील,” असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुप्रीम कोर्टात धाव
महायुतीला राज्यातील 288 जागांपैकी 230 जागा महायुतीला मिळाल्यामुळे महाविकास आघाडीने कोर्टामध्ये धाव घेतली. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र पराभव झाला तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आणि तुम्ही जिंकलात तर ते यश. असे कसे होऊ शकते? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला.