महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाचा दणका (फोटो- ट्विटर)
Maharashtra vidhansabha Nivadnuk 2024: महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे. महायुतीने 288 जागांपैकी एकूण 230 जागा जिंकत घवघवीत बहुमत प्राप्त केले आहे. तर एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने या निर्णयावर संशय व्यक्त केला होता. ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यावर आज कोर्टात सुनावणी पार पाडली.
सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीची बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आणि तुम्ही जिंकलात तर ते यश. असे कसे होऊ शकते? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे , दारू आणि अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवारास पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी असणार आहे असे कोर्ट म्हणाले. दरम्यान कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळून लावल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
अतुल लिमये महायुतीच्या विजयाचे शिल्पकार
विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. जो निकाल समोर आला ते पाहून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे म्हटले जाते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नियोजनबद्ध मदत केल्याचे समोर येत आहे. हे सगळे नियोजन संघाच्या अतुल लिमये यांनी केल्याचे म्हटले जात आहे. अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत.
हेही वाचा: RSS For BJP: प्रचारक ते संयुक्त महासचिव; महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?
कोण आहेत अतुल लिमये?
अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आखलेल्या कुशल रणनीतीमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जाते. अतुल लिमये हे गेले अनेक वर्षे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांनी ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण वेळ संघासाठी प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कुशल आणि सूक्ष्म नियोजन केले, त्यामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
अतुल लिमये हे सुरुवातीला महाराष्ट्रात, रायगड आणि कोकण प्रांतात काम करत होते. त्यानंतर त्यांना देवगिरी प्रांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. ते सह प्रांत प्रचारक होते. 2014 च्या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र , गुजरात आणि गोवा प्रांताची व्यापक जबाबदारी देण्यात आली. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची सखोल जाण असल्याने, तसेच अगदी तळगाळापर्यंत संपर्क असल्याने उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांचे समोर आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लिमये यांनी नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाह जवळून काम केले. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.