Shivaji Sawant supports Ranjit Shinde in Madha Assembly Constituency
टेंभुर्णी : महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माढा तालुक्यातील नेते व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले. तसेच त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार बबनदादा शिंदे यांनी प्राध्यापक सावंत यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की, “मी महायुतीचा शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा संपर्कप्रमुख आहे. महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी काय राजकारण करायचे ते करतील पण आम्ही माढ्यातून परक्या उमेदवाराचे समर्थन करून त्याचे काम करण्यापेक्षा रणजीत शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. यापुढे माझ्या व आमदार बबनदादा शिंदे यांच्या विचाराने तालुक्यातील राजकारण चालेल,” असे मत शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, “शिंदे आणि सावंत कुटुंबीयांचे अनेक वर्षापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मध्यंतरी काही राजकीय मतभेद झाले असतील हे मला मान्य आहे. परंतु राजकारण आणि वैयक्तिक संबंध यात फरक असतो. प्राध्यापक सावंत यांच्या पाठिंब्यामुळे रणजीत शिंदे यांचा विजय सोपा झाला का…? असे विचारले असता आमदार बबनदादा म्हणाले की रणजीत शिंदे यांचा विजय आज देखील निश्चितच आहे, परंतु प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या पाठिंबामुळे हा विजय आणखी सोपा होणार आहे.”
हे देखील वाचा : या सर्वांना पाडून टाका…; मनोज जरांगे पाटलांचे नेमके मराठा समाजाला सांगणे तरी काय?
रणजीत शिंदे यांना अनेकांचा पाठिंबा
आमदार बबनदादा शिंदे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि काही वर्षांपूर्वी दादांच्या पासून दुरावलेले समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजीराव कांबळे यांनी नुकताच आमदार बबनदादा शिंदे गटात प्रवेश केला आहे व ते माढा मतदारसंघातील विधानसभा उमेदवार रणजीत शिंदे यांच्या विजयासाठी प्रचारात सामील झाले आहेत.. त्यांचे पाठोपाठ आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनीही रणजीत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे भाजपा माढा तालुका माजी अध्यक्ष योगेश बोबडे यांनी देखील रणजीत शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे व ते देखील आपला पाठिंबा लवकरच जाहीर करणार आहे असे समजते.याच प्रकारे माढा मतदारसंघातील आणखीन काही विरोधी प्रतिष्ठित मान्यवर राजकारणी मंडळी आमदार बबनदादा शिंदे यांचे गटात सामील होऊन अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन करून प्रचारात सामील होतील असे संकेत मिळत आहेत.