Thackeray group aggressive against Praniti Shinde and Sushilkumar Shinde in Solapur South Constituency
सोलापूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान झाले आहे. आता येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तर दोन गटांमध्ये व नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याची देखील प्रकार घडला. सोलापूरमध्ये मात्र मतदानाच्या दिवशी देखील जोरदार राजकारण रंगले.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या पदरात पडला. मात्र युतीमध्ये असलेल्या खासदार प्रणिती शिंदे व जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ऐनवेळेला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. शिंदे परिवाराने मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. कादाडी हे शांत व संयमी व्यक्तीमत्त्व असल्याचे म्हणत प्रणिती शिंदे यांनी काडादी यांना पाठिंबा दिला. यामध्ये आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नेहमी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र युतीमुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला होता. सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिंदे पिता पुत्राने पाठिंबा काढून घेतल्यामुळे अमर पाटील यांना धक्का बसला. आता ठाकरे गटाने मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेल्या फलकाला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. शिंदे पिता – पुत्रीने अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मतदानानंतर बिघाडी झाली असल्याचे चित्र सोलापूरमध्ये आहे.
सुशीलकुमार शिंदे यांचे मत
अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूरबाबत शिवसेनेने गडबड केली. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून मी दोन वेळा तर आनंदराव देवकतेही निवडणून आले आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिण हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. एकादाच कधी तरी यांचा आमदार निवडून आला तर त्यांनी लगेच मतदारसंघावर दावा केला, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
त्याचबरोबर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,”सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आघाडीधर्म आम्ही पाळला. आम्हीशेवटच्या क्षणी एबी फॉर्म मागे घेतला. दिलीप माने यांनीही आपला एबी फॉर्म मागे घेतला. पण आम्हाला इथे फ्रेंडली फाईट हवी होती, पण ती होऊ शकली नाही. त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला. संजय राऊत यांनी यादीत काही बदल होईल असं सांगितलं होतं. त्यामुळं आम्हाला वाटलं होतं की सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटानं चुकून जाहीर केलीय. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं आज आम्ही काडादी यांच्या सोबत आहोत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, त्यामुळं जो जितेगा वही सिकंदर होगा. आम्ही एबी फॉर्म नाही दिला कारण काँग्रेसला आघाडी धर्म पाळायचा होता,” असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.