Uddhav Thackeray praised BJP leader Pankaja Munde
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. आज (दि.18) निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचाराचा अक्षऱशः धुराळा उडाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. विविध योजनांवर आणि फुटीर राजकारणावरुन उद्धव ठाकरे आक्रमक झाले. त्याचबरोबर त्यांनी भाजप नेत्यांचे कौतुक देखील केले. त्या नेत्या म्हणजे पंकजा मुंडे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेमध्ये पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपकडून अनेक घोषणा देण्यात आली आहे. यामध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा लक्षवेधी ठरत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेमध्ये ही घोषणा दिली. त्यानंतर सर्व भाजप नेत्यांनी याच घोषणेची री ओढली. बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर राज्याचे राजकारण रंगले आहे. महायुतीमधील काही घटकपक्षांनी या घोषणेला विरोध केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचे जाहीर सभेमध्ये कौतुक केले. पंकजा मुंडे यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेची गरज नसल्याचे म्हणत महायुतीला घरचा आहेर दिला होता. त्यावरुन जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंकजा ताई तुझे खूप आभार. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. जसे आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडून स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती. तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची काढली.” उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या एका विधानाचा हवाला दिला. ते म्हणाले, “पंकजा ताई म्हणाल्या की, भाजपाचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात 90 हजार बुथ आहेत. प्रत्येक बुथवर भाजपाचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या १ लाख ८० हजार होते. जर दोन पेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपाने गुजरातमधून आणली आहेत.” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “भाजपाने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणली आहेत. ही आज नजर ठेवायला माणसे आणली आहेत. उद्या यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकविण्याचा डाव आहे. हे तर आता फेक नरेटिव्ह नाही ना. कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजपा इथे पराभूत झालेली आहे. त्यांचे लोक इथे राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहिलेल्या भाजपाप्रेमींवर भाजपाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.