
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Friday OTT Release: वीकेंडला घरबसल्या मनोरंजन करण्याचा प्लॅन असेल, तर यावेळी प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कॉमेडी शो, क्राइम थ्रिलर, रोमँटिक ड्रामा आणि अॅक्शन फिल्म्सपासून रिअॅलिटी शोपर्यंत विविध प्रकारचं कंटेंट या आठवड्यात ओटीटीवर दाखल होत आहे. त्यामुळे तुम्हाला कॉमेडी आवडत असो किंवा थ्रिलर आणि रोमांस, प्रत्येकासाठी काही ना काही पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया या शुक्रवारच्या ओटीटी रिलीजबद्दल…
कॉमेडियन जाकिर खानचा स्पेशल शो या वीकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या खास आणि मिश्कील अंदाजात जाकिर खान या शोमध्ये बालपणीच्या आठवणी आणि किस्से सांगताना दिसणार आहे. हा शो 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
‘लस्ट स्टोरीज सीजन 3’
चर्चित ‘लस्ट स्टोरीज’ फ्रँचायझीचा तिसरा सीजनही याच आठवड्यात रिलीज होत आहे. आधुनिक नाती, इच्छा आणि भावनांवर आधारित या सीजनमध्ये राधिका आप्टे, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी, विजय वर्मा, राधिका मदान, अली फजल आणि सिद्धार्थ यांच्या भूमिका आहेत.
‘लस्ट स्टोरीज 3’चं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. ही सीरिज 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
‘थुडक्कम’
मल्याळम भाषेतील अॅक्शन थ्रिलर*थुडक्कम’ही ओटीटीवर दाखल होणार आहे. जूड एंथनी जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात आशीष जो एंटनी आणि मोहनलाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आशीष यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट 18 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
‘द स्कँडल’
दक्षिण कोरियन पीरियड रोमांस ड्रामा सीरिज ‘द स्कँडल’देखील या वीकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जोसोन राजवंशाच्या काळातील ही कथा आहे. समाजाने घालून दिलेल्या कठोर नियमांना बाजूला सारत प्रेम आणि आकर्षणाच्या धोकादायक खेळात अडकलेल्या व्यक्तींची कथा यात पाहायला मिळणार आहे.
सोन ये-जिन आणि जी चांग-वूक यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.
‘इरुमुडी’
अभिनेता रवि तेजा यांचा ‘इरुमुडी’ हा अॅक्शन-ड्रामा चित्रपटही या आठवड्यात डिजिटल रिलीजसाठी सज्ज आहे. 21 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
‘कट्टलन’
मल्याळम भाषेतील अॅक्शन थ्रिलर ‘कट्टलन’देखील ओटीटीवर दाखल होत आहे. या वर्षी मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता हिंदी भाषेत 18 सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
चित्रपटात एंटनी वर्गीस, सुनील आणि कबीर दूहन सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘मोबलँड सीजन 2’
ब्रिटिश क्राइम ड्रामा सीरिज ‘मोबलँड’चा दुसरा सीजनही या आठवड्यात रिलीज होणार आहे. एकूण 10 एपिसोड असलेली ही सीरिज एका मोठ्या माफिया कुटुंबाभोवती आणि त्यांच्या सत्तासंघर्षाभोवती फिरते. ‘मोबलँड सीजन 2’ 18 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
‘मैंगो पच्चा’
क्राइम ड्रामा आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मैंगो पच्चा’ हा पर्याय आहे. कन्नड भाषेतील हा क्राइम थ्रिलर चित्रपट जूनमध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 14 सप्टेंबर 2026 पासून हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
या चित्रपटातून संचित संजीव यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ते अभिनेता किच्चा सुदीप यांचे भाचे आहेत.
कॉमेडीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी अमेरिकन कॉमेडी फिल्म ‘बेस्ट ऑफ द बेस्ट’ हा पर्याय आहे. दोन बालपणीच्या जिवलग मित्रांभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
म्हणजेच, या वीकेंडला ओटीटीवर कॉमेडी, अॅक्शन, क्राइम, थ्रिलर आणि रोमांस अशा विविध जॉनरमधील कंटेंटची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.