
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
रितेश पालच्या या विजयामागे मोठा संघर्ष आहे. विशेष म्हणजे, सुमारे सहा वर्षांपूर्वी रितेशने याच शोमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला त्यावेळी नकार मिळाला होता. हा नकार स्वीकारून थांबण्याऐवजी रितेशने आपल्या नृत्याच्या प्रवासात सातत्य ठेवले आणि अखेर त्याच मंचावर विजेता होण्याचा मान मिळवला.
रितेशच्या प्रवासातून त्याची मेहनत आणि नृत्याप्रती असलेली जिद्द दिसून येते. संपूर्ण सीझनमध्ये त्याने वेगवेगळ्या डान्स फॉर्म्समध्ये स्वतःला आजमावत आपली क्षमता सिद्ध केली. त्याने या सीझनमध्ये तीन वेळा ‘बॅटल ट्रॉफी’ जिंकली होती.
सहा दिवस डान्स, सातव्या दिवशी सलूनमध्ये काम
१९ वर्षीय रितेश पालची कहाणी संघर्षाची आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि नृत्यासाठी केलेल्या मेहनतीबद्दल सांगितले होते.
एका टप्प्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नृत्य सोडून भावासोबत सलूनमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र रितेशने नृत्याची साथ सोडली नाही. तो सहा दिवस नृत्याचा सराव आणि काम करत असे, तर सातव्या दिवशी भावासोबत सलूनमध्ये काम करत असे. या संघर्षातूनही त्याने आपले ध्येय कायम ठेवले.
आज त्याच मेहनतीचे फळ त्याला मिळाले असून, ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ५’च्या ट्रॉफीवर रितेशने आपले नाव कोरले आहे.
ग्रँड फिनालेमध्ये रितेश आणि प्रतीक यांच्यासोबत दिपाली बोरकर, प्रथमेश माने, अंशिका धारा आणि गीतांजली मारवाह हे स्पर्धक अंतिम फेरीत होते. अखेर रितेश आणि प्रतीक या जोडीने विजेतेपद पटकावले.
करिश्मा कपूरसह या कलाकारांची उपस्थिती
‘इंडियाज बेस्ट डान्सर ५’च्या ग्रँड फिनालेमध्ये करिश्मा कपूर, गीता कपूर, टेरेन्स लुईस आणि जावेद जाफरी यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. तर जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रितेशच्या विजयामुळे त्याच्या सहा वर्षांच्या संघर्षाला एक सुंदर वळण मिळाले आहे. ज्याच शोमध्ये एकेकाळी नकार मिळाला, त्याच मंचावर आज त्याने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.