
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे 16 ते 20 जूनदरम्यान मराठी लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात 19 निवडक कलाकृतींचे प्रदर्शन होणार असून, नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शकांना आपली कला सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात होणार आहे. 16 ते 20 जून या कालावधीत दररोज चित्रपटांचे प्रदर्शन होईल, तर 19 जून रोजी विशेष सत्र दुपारी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’, ‘नेहमीच’, ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्पलेट’, ‘अर्जुन’, ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डीयर 202’, ‘17 वे वर्ष’, ‘पाणखोल’, ‘डोंगर पाणी’, ‘दारवठा’, ‘वाघ’, ‘सापशिडी’ आणि ‘मुक्ता’ यांसारखे लघुपट तसेच ‘फड’ आणि ‘महाल्ले’ हे माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर भाष्य करणाऱ्या या कलाकृती प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहेत.
ग्रामीण जीवन, बदलती सामाजिक परिस्थिती, मानवी नातेसंबंध आणि समकालीन वास्तव यांचे संवेदनशील चित्रण या चित्रपटांतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच विचारप्रवर्तक आशयाची मेजवानीही रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी लघुपट आणि माहितीपट क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण निर्मितींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव नव्या प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमांचा आस्वाद घेण्याची संधी देणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलतेचा उत्सव म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून, चित्रपटप्रेमींसाठी तो निश्चितच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.