
फोटो सौजन्य - Social Media
पॉवर-पॅक्ड नव्या पोस्टरसह ग्लोबल स्टार राम चरणच्या बहुप्रतीक्षित पॅन-इंडिया चित्रपट ‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. दमदार अवतारातील नव्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली असून, चाहत्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. राम चरणसाठी हा क्षण दुहेरी आनंदाचा ठरत आहे. नुकतेच ते जुळ्या मुलांचे वडील झाले असून, त्याचवेळी त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपटही मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘पेड्डी’ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सतत चर्चेत आहे. प्रभावी अनाउन्समेंट ग्लिम्प्स, दमदार फर्स्ट-लुक पोस्टर्स, टीझर झलक आणि सुपरहिट गाणं ‘चिकिरी चिकिरी’ यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. 2026 मधील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक म्हणून ‘पेड्डी’कडे पाहिले जात असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन व्हिजनरी दिग्दर्शक बुची बाबू साना करत आहेत.
आता निर्मात्यांनी नव्या पॉवर-पॅक्ड पोस्टरसोबतच चित्रपटाची भव्य थिएटर रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘पेड्डी’ 30 एप्रिल 2026 रोजी (वीकेंड) इव्हेंट रिलीज म्हणून जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. या तारखेमुळे ‘पेड्डी’ हे वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
नव्या पोस्टरमध्ये राम चरण लांब केस, दाट दाढी, रक्ताने माखलेला चेहरा आणि धुळीत माखलेला रफ-टफ अवतार घेऊन दिसत आहेत. गर्दीत उभा असलेला त्यांचा हा आक्रमक लूक एका जबरदस्त, मास-अपील असलेल्या पात्राची झलक देतो. केवळ एका पोस्टरमधूनही चित्रपटातील कॅरेक्टरची ताकद, जिद्द आणि रॉ एनर्जी ठळकपणे जाणवते.
पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे, “त्याच्या येण्याची तारीख बदलू शकते, पण त्याची अफाट ताकद आणि जिद्द नाही #PEDDI वर्ल्डवाइड रिलीज 30 एप्रिल 2026.” या ओळींनी चाहत्यांमधील उत्साह आणखी वाढवला आहे.
दरम्यान, ‘पेड्डी’मधील ‘चिकिरी चिकिरी’ हे गाणे रिलीज होताच प्रचंड लोकप्रिय ठरले. अवघ्या 24 तासांत या गाण्याने 46 मिलियन व्ह्यूज मिळवले होते. पुढे विविध भाषांतील यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मिळून या गाण्याने 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 20 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळवत विक्रम नोंदवला. हे गाणे दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले असून, मोहित चौहान यांच्या आवाजात आणि बालाजी यांच्या शब्दांत ते साकारले आहे.
राम चरण, जान्हवी कपूर, जगपती बाबू, शिवा राजकुमार आणि दिव्येंदू शर्मा यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला ‘पेड्डी’ बुची बाबू साना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. भव्य स्केल, दमदार कथा आणि जबरदस्त सादरीकरणामुळे ‘पेड्डी’ 30 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांसाठी एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.