फोटो सौजन्य - Social Media
सातत्य, शिस्त आणि समर्पण यांचा एकत्रित परिणाम काय असतो, याचे उत्तम उदाहरण हॅबिल्डचे सह-संस्थापक आणि योग शिक्षक सौरभ बोथरा यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. सलग २००० दिवस योगाभ्यास करण्याचा त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक साधना नसून एक प्रेरणादायी चळवळ ठरला आहे. आजारपण, प्रवास, व्यस्त दिनक्रम किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या या कोणत्याही कारणामुळे त्यांचा योग साधनेत खंड पडला नाही.
त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल वर्ल्ड रेकॉर्ड युनियनने घेतली आणि सहावा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला. ही केवळ नोंद नसून, लाखो लोकांसाठी जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याची प्रेरणा आहे. बोथरा यांनी यशस्वीपणे सिद्ध केले की योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मिक संतुलन आणि एकूण जीवनाचा संतुलित प्रवास आहे. हॅबिल्डच्या माध्यमातून कोट्यवधींच्या जागतिक परिवाराला त्यांनी शिकवले की खरी ताकद ही सोयीपेक्षा शिस्तीत असते. या उपलब्धीबद्दल बोलताना सौरभ बोथरा म्हणाले की, “२००० दिवसांचा योग हा फक्त माझा प्रवास नाही, तर आपल्या संपूर्ण हॅबिल्ड परिवाराची सामूहिक साधना आहे. लाखो लोक दररोज योगाभ्यासाची निवड करून या सातत्याला नवी ऊर्जा देत आहेत.
ही आता केवळ माझी गोष्ट नसून आपल्या सर्वांच्या सामर्थ्याची आणि सातत्याची प्रेरणादायी कथा आहे.” सौरभ यांच्या या नवनिर्मित विक्रमामुळे हॅबिल्डच्या यशस्वी प्रवासात आणखी एक मैलाचा दगड जोडला गेला आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये हॅबिल्डने युट्युबवर योगा लाईव्ह स्ट्रीम पाहणाऱ्या सर्वाधिक प्रेक्षकांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डस् युनियनकडून एका दिवसात सर्वाधिक लाईव्ह व्यूअरशिप आणि सर्वात मोठा वर्चुअल मेडिटेशन क्लास यासाठीही किताब मिळवला. २०२३ मध्ये त्यांनी सर्वात मोठ्या वर्चुअल योगा क्लासचा रेकॉर्ड नोंदवला होता.
त्याचप्रमाणे, २०२५ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्डकडून सर्वात मोठ्या समन्वित वर्चुअल योगा सेशनसाठी १६९ देशांतील तब्बल ७,५२,०७४ सहभागींसह आणखी एक नवा मानाचा तुरा त्यांनी मिळवला. या सर्व कामगिरींमधून योगाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासह शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौरभ बोथरा यांनी घडवलेला हा विक्रम केवळ जागतिक कीर्तिमानापुरता मर्यादित नसून, आधुनिक जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याची प्रेरणादायी दिशा देणारा ठरतो.