इराणी कॅफेत काय काय मिळतं (फोटो सौजन्य - फेसबुक)
संजीव साबडेः ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी मुंबईतील इराणी रेस्टारंटच्या जागवलेल्या या मनोरम आठवणी आपण आज लेखातून जाणून घेऊया.
आरामात चहा प्यायचा असेल तर जावं इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये. मित्रांसह खूप वेळ गप्पा मारायचं योग्य ठिकाण म्हणजे इराणीच. तिथं चहाबरोबर केक मागितला की वेटर एका प्लेटमध्ये चार पाच केक व पॅस्ट्रीज आणून ठेवतो, बिस्कीट वा खारी मागितली तरी चार पाचचीच प्लेट येणार. आपल्याला टेन्शन की आता किती बिल येणार. पण तो वेटर सांगतो, साब जितना खाओगे, उसका ही बिल आएगा. चहाबरोबर बन मस्का मागा खावा तर तिथंच. प्लास्टिकच्या प्लेटमध्ये ठेवतो तो वेटर. काही जण मस्का लावलेले ब्रेडचे स्लाईस मागवतात, तेव्हा काउन्टरवरचा म्हातारा इराणी मालक चष्म्यातून प्रेमानं पाहतो, कारण तो ब्रेड तिथंच बनलेला असतो. त्याचा त्याला अभिमान असतो.
शक्यतो गोल काळी टेबलं, त्यावर काच, काचेखाली मेन्यू कार्ड आणि खुर्चीही टेबलाला मॅच करणारी. एक चहा घेऊन कितीही वेळ बसा, कोणीही तुम्हाला उठा, असं सांगत नाही. अनेक जण पेपर वाचत असतात तिथं उडप्याच्या हॉटेलप्रमाणे खात असताना इतर लोक आपल्या उठण्याची वाट पाहत मागे उभे असतात. असं इथं होत नाही. तास, दीड तास गप्पा मारणारे लोक इराणी रेस्टॉरंटमध्येच दिसतात. म्हातारा मालक मधूनच तिथं रागानं पाहतो. पण काही बोलत मात्र नाही.
आपल्या शेजारच्या टेबलावर कोणी पारशी खात असतो. तो उठतो आणि बिल न देता सरळ बाहेर पडतो. पण त्याला कधीच अडवलं जात नाही. कारण तो तिथला पैसे न देता खाणारा रोजचा कस्टमर असतो. आपल्या समाजतील लोकांची पोटाची जबाबदारी जणू या रेस्टॉरंटची असते. हल्ली फारशा राजकीय, सामाजिक चळवळी होत नाही. पूर्वी अशा चळवळीतील व खिशात जास्त पैसे नसलेले कार्यकर्ते तिथं चहा पीत, सिगारेट ओढत बसून असत. बन मस्काऐवजी आणखी दोन सिगारेटी हे गणित.
हेल्दी स्ट्रीट फूड जे ठेवतील शरीर निरोगी, कधीही आणि मजेत खा!
प्रेमिकाचंही इराणी हॉटेल हेच आवडीचं ठिकाण असायचं. विशेषतः दुपारच्या निरव शांततेत. एक कप चहा आणि तासनतास हळुवार, कोणाला ऐकू जाणार नाहीत, अशा प्रकारे गप्पा. मध्येच हाताला हात लागला वा लावला ही लाजून मान खाली घालणार, मग तो मध्येच तिच्या केसांची कपाळावर आलेली बट आपल्या हातानं मागे सारणार. सारं वातावरण एकदम रोमँटिक. पूर्वी तर इराणी हॉटेलात फॅमिली रूम नावाच्या केबिन असायच्या. काही ठिकाणी फॅमिलीसाठी पोटमाळा. एकट्या पुरुषाला तिथं जाण्याची परवानगीच नाही. अर्थात आताही चार पाच ठिकाणी अशी व्यवस्था आहे! माझा कवीमित्र व चित्रकार नितीन दादरावाला याने पाटकर कॉलेजात असताना कोणा मैत्रिणीला उद्देशून जी कविता लिहिली, त्यात
“ आठवतो त्या इराण्याकडील
चहाचा कप अन तासनतास गप्पा?
तेथील चहाचा दर आता
कमी झालाय ग,
तू असायला हवी होतीस”
अशी प्रेमळ हिशेबी भावना व्यक्त केली होती. इराणी रेस्टॉरंटची अशी जी वेगळी संस्कृती आजही टिकून आहे, ती उडप्याकडे दिसणार नाही.
इराण्याकडील सारे प्रकार वेगळे, उडप्याकडे न मिळणारे. चहा, ब्रेड, बनमस्का याबरोबरच व्हेज व नॉन व्हेज पफ, समोसा, पॅटिस, मटण व चिकन कटलेट, सँडविचेस, डबल डेकर ऑम्लेट पाव ही कायमच इराणी रेस्टॉरंटची खासियत राहिली आहे. इथला खिमा व खिमा घोटाला, खिम्मा सल्ली हे प्रकार एकदम मस्त. व्हेज व चिकन, मटण धनसाक इथला प्रत्येक खाद्यपदार्थ अतिशय ताजा असतो. प्रत्येक टेबलावर सॉसची बाटली असतेच. चिकन फरचा, पात्रानी मच्छी, अंडा मसाला आणि सर्वावर कडी म्हणजे इराण्याकडील बेरी पुलाव. पण शाकाहारी पुलाव आणि धनसाक दाल हे कॉम्बिनेशनही मस्त. स्मोक्ड चिकन, व्हेज व नॉन व्हेज पॅटियो अशा साऱ्या आगळ्या वेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे इराणी रेस्टॉरंट. इराण्याकडलं पुडिंग व कॅरमल कस्टर्ड तर एकदम भारी.
इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये बेकरीही हमखास असते. पाव, केक, पेस्ट्रिज, बिस्कीटं, खारी, टोस्ट, बटर हे सारं त्या बेकरीतच बनवलं जातं. ती बेकरी रेस्टॉरंटचाच भाग असते. इराण्याच्या पावांचे व बिस्कीटांचे प्रकारही अफलातून. तिथं साधा पाव नेहमी ताजा गरमच मिळतो. अनेकदा सकाळी ब्रेड बनवणं सुरु असतं. ब्रेडच्या लादीचे स्लाईस ज्यात तयार होतात, ते कटर मशीन फोर्टच्या याझदानीमध्ये डोळ्यात भरतं. वाईन बिस्कीट, खोबऱ्याची, आत जाम असलेली बिस्कीटं, काही गोड, काही खारी बिस्कीटं, फ्रुट बिस्कीटं, चॉकलेट व स्ट्रॉबेरी बिस्कीटं, विविध कुकीज मोठे वा छोटे केक, कप केक, रवा केक, नान खटाई असं सारं हे इराणी आपल्या रेस्टॉरंटमधील बेकरीतच बनवतात. ते इतके मस्त की तिथून बिल देऊन बाहेर पडताना केक, पॅटिस, समोसे, कटलेट वा बिर्याणी घरी नेण्याची तीव्र इच्छा होते. इराणी रेस्टॉरंटमध्ये येणारे निम्मे लोक तरी या बेकरी पदार्थांचं पार्सल नेता. बटाटा वेफर्सही खावेत ते इराण्याकडचेच. आता काही इराणी रेस्टॉरंटमध्ये चायनीज, मुघलाई तसेच इराण्यांचं वैशिष्ट्य नसलेले सँडविच मिळू लागले आहेत. धंदा करायचं तर सर्वच ठेवावं लागतं. पण ती त्यांची खासियत नाही.
उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी
एके काळी मुंबईत इराणी रेस्टॉरंटची संख्या तीन आकड्यांत होती, ती दोन आकड्यांवर आली आहे. धोबी तलावजवळचा बस्तानी बंद झाला, पण समोरचा कयानी पाय रोवून उभा आहे. तिथं जवळ एक ससानियान आहे आणि आणखी एक आहे ग्रँट रोडला. फोर्टमध्ये कॅफे मिलिटरी, ब्रिटानिया, याझदानी बेकरी, कॅफे एक्सेलसिअर (एक्सेलसिअर सिनेमाच्या समोर ), आयडियल कॉर्नर, आहे. कुलाब्याला पॅरेडाईज आहे. माटुंग्याला कूलर अँड कंपनी आहे. टिळक पुलावरून खोदादाद सर्कलकडे येताना हिंदू कॉलनीच्या नाक्यावरच कॅफे कॉलनी आहे. माहीमला लेडी जमशेदजी रोडवर कॅफे इराणी चाय हे अलीकडेच सुरू झालं आहे. पूर्वी डॉ. आंबेडकर रोडवर मॉडर्न टाइम्स व तुफान मेल हे इराणी होते, ते आता दिसत नाहीत. गिरगावातलं सनशाईन बंद झालं. ग्रँट रोड स्टेशनच्या पूर्वेला असलेलं मेरवान बंद होता होता टिकून राहिलं.
अंधेरीला स्वामी विवेकानंद मार्गांवर मेरवान नावाची दोन शॉप्स आहेत. एकात स्नॅक्स, तर दुसऱ्यात केक्स. तिथून समोरच्या बाजूला अहुरा बेकरी वर्षानुवर्ष बेकरी पदार्थ विकत आहे. अंधेरी स्टेशनसमोर दोन मॅकडोनाल्ड आहेत. तिथं पूर्वी दोन इराणी रेस्टॉरंट होती. ती केव्हाच बंद झाली. पोदार कॉलेजशेजारचं कॅफे गुलशन आहे. कुलाब्याचं लिओपोल्ड आणि पिकाडिली, महात्मा फुले मंडईजवळचं गुलशन ए इराण ही माहीत असे. कांदिवली पूर्वेलाही इराणी कॅफे नावाचं रेस्टॉरंट आहे.
पूर्वी मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्ये मिळून 350 च्या आसपास यांची रेस्टॉरंट होती. पुण्यातलं गुडलक सर्वांना माहीत आहे, पण कॅम्पमध्येही काही आहेत. हैदराबादलाही बरीच आहेत. पण आता सर्व मिळून ती बहुधा 50 असतील. पुढच्या पिढीतील लोकांना या धंद्यात रस नाही. प्रिंसेस स्ट्रीट आणि भवन्स (गिरगांव चौपाटीपाशी) असलेली रेस्टॉरंट त्यांच्या मालकांनी थेट बार चालवण्यासाठी दिलीत. असे बदल होतच असतात. पण ती बंद होण्याआधी इराणी खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी नक्कीच जा.