
सुकामेवा हा शरिरासाठी नेहमीच गुणकारी ठरतो. बदाम, अक्रोड आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्याने त्याचे जास्त फायदे मिळतात, असं सांगितलं जातं. आरोग्य तज्ज्ञ अनेकदा मूठभर ड्रायफ्रूट्स खाऊन दिवसाची सुरुवात करण्याची शिफारस करतात. मनुका किंवा सुकवलेली द्राक्षे विशेषतः पचनास मदत करतात, लोहाची पातळी वाढते आणि हाडे मजबूत राहतात. पोषणतज्ज्ञ भुवन रस्तोगी यांच्या मते, मनुका (raisins Benefits) आरोग्यासाठी फायदेशीर आहे, इतर ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट टिकून राहतात. ते म्हणाले, यामध्ये लोह मध्यम आणि पोटॅशियम जास्त असते. बदलत्या आणि कठोर हवामानात सुका मेवा हा पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे.
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, मनुके (Soaked raisins) हे सुपरफूड आहेत आणि ताज्या द्राक्षांपेक्षा (Fresh Grapes) त्यामध्ये जास्त पौष्टिक मूल्य असतात. मात्र, सामान्यतः मानला जाणारा हा समज दूर करण्यासाठी पोषणतज्ञ रस्तोगी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
मनुके पुन्हा रि-हाइड्रेट करण्याचा काही फारसा फायदा नाही. मनुके भिजवून खाल्ल्याचा फायदा होतो, असं मला कुठंही दिसून आलेलं नाही. या विषयावर कोणतेही महत्त्वाचे संशोधन उपलब्ध नाही. सर्व अभ्यास लेखांमध्ये फक्त मनुक्यांच्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे. मनुके पाण्यात भिजवून खाण्याचे कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाहीत, असे रस्तोगी म्हणतात.