उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० सैनिक बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. हर्षिलवळील धराली गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड मलबा वाहून आला आणि या मलब्यात शेकडो घरं गाडली गेली आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात हाहाकार माजला. ही घटना भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर घडली असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त
गंगोत्री धामचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. पावसाचे पाणी आणि डोंगरावरून आलेला मलबा इतक्या वेगात खाली आला की, संपूर्ण धराली गाव पाण्याखाली गेले. बाजारपेठा, हॉटेल्स, वाहने, घरे – सगळं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. “अशी आपत्ती मी याआधी कधीच पाहिली नव्हती. सगळं काही क्षणात नष्ट झालं, असं एका प्रत्यक्षदर्शिने सांगितलं.
ही दुर्घटना खीरगंगा परिसरात सात तालाजवळ हर्शिला पर्वतीय भागात घडली. धराली हे गाव उजव्या बाजूला असून, डाव्या बाजूला हर्षिलच्या तेलगाड भागात लष्कराचं कॅम्प आहे. या भागात त्यावेळी २०० हून अधिक स्थानिक आणि पर्यटक उपस्थित होते.
या नैसर्गिक संकटात भारतीय लष्कराचाही मोठा फटका बसला आहे. हर्षिलमधील १४ राजरिफ युनिटच्या कॅम्पला पुराचा फटका बसला असून, १० जवान आणि एक जेसीओ अद्याप बेपत्ता आहेत. एक अधिकारी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या आपत्तीतही लष्कराचे अधिकारी आणि जवान बचावकार्यात सहभागी झाले असून, आतापर्यंत त्यांनी १५ जणांचे प्राण वाचवले आहेत. याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
या भागात नदीकिनारी असलेले हेलीपॅड देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे, ज्यामुळे हेलिकॉप्टरमार्फत मदत कार्य करणे अशक्य झाले आहे. उत्तरकाशीहून धरालीकडे येणाऱ्या मार्गावर नेतला भागात भूस्खलन झाल्याने रस्ते बंद झाले आहेत आणि बाह्य मदत पोहोचणं अत्यंत कठीण बनलं आहे.
मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त
एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस, लष्कर आणि अन्य आपत्कालीन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. खीरगड नाल्याच्या पूरामुळे परिसरात आणखी नुकसान झाले असून, सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेले लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत.सध्या पूर्ण परिसरात मदतकार्यात अडथळे येत असून हवामानही साथ देत नाही. मात्र सर्व यंत्रणा याठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. हर्षिल आणि धराली परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.