मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उदध्वस्त
मध्य प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पावासाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात आतापर्यंत २७५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.त्यापैकी ६१ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, नद्या, नाले आणि पाणी साचल्याने १४४ जणांचा मृत्यू झाला आहे, रस्ते अपघातात ५७ जणांचा झाला आहे, तर भिंत कोसळून आणि मातीच्या ढिकाऱ्याखाली सापडून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशोकनगर जिल्ह्यात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाला आहे आणि देवास आणि सिधी येथे नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात पावसामुळे झालेल्या जीवितहानीसोबतच प्राणी आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १,६५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी २९३ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय ३,६८७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
ग्वाल्हेरमधील १ घर पूर्णपणे आणि एकाचे अंशतः नुकसान झालं आहे. तसेच, जबलपूर, मांडला, मंदसौर, रायसेन, राजगड, शहडोल आणि उमरिया जिल्ह्यांमध्ये अनेक घरांचं अनुकसान झालं आहे. सुमारे २५४ रस्ते आणि पूल देखील उद्ध्वस्त झाले आहेत.
…तर हिमाचल प्रदेश देशाच्या नकाशावरून गायब होईल; सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं?
प्रशासनाने घरे गमावलेल्या आणि धोक्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी २० हून अधिक मदत छावण्या उभारल्या आहेत. या छावण्यांमध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे. मांडला जिल्ह्यात ३ छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये २३० लोकांनी आश्रय घेतला आहे. गुणामध्ये २ छावण्या उभारण्यात आल्या आहेत, जिथे १७० लोकांनी आश्रय घेतला आहे. खरगोनमधील ८ छावण्यांमध्ये १३८४ लोकांनी आश्रय घेतला आहे. दमोहमधील ५ छावण्यांमध्ये १५९० लोकांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय, राजगडमधील एका छावणीत ३० लोकांनी आश्रय घेतला आहे.