या ११ जागा ठरवणार बिहारचं राजकीय भवितव्य; १००० हजार पेक्षा कमी मतांनी झाला होता विजय
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. २४३ जागांसाठी या राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया ब्लॉक यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय वातारण तापू लागलं आहे. दरम्यान बिहारमध्ये काही जागा अशा आहेत, ज्या निकालाचं चित्र पलटू शकतात. या जागांमुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ११ विधानसभा जागा अशा आहेत विजयाचं अंतर १,००० पेक्षा कमी होते. आता २०२५ मध्ये या ११ जागांवर खरी लढत होणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही आघाडीसाठी या ११ जागा निर्णायक ठरू शकतात. या जागा या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांसाठी ‘गोल्डन झोन’ बनू शकतात.
२०२० च्या निवडणुकीत, एकूण २४३ विधानसभा जागांपैकी अनेक जागांवर अतिशय निकराच्या लढती झाल्या. काही उमेदवार १,००० पेक्षा कमी मतांनी जिंकले, तर अनेक मोठी नावे पराभवाच्या उंबरठ्यावर होती. या ११ जागा अशा होत्या जिथे मतदारांचा कल थोडा बदलला असता तर निवडणुकीचं निकालाचं चित्र काहीसं वेगळं असतं.
जेडीयूने हिल्सा, बारबिघा, भोरे आणि परबट्टा यासारख्या जागा खूपच कमी फरकाने जिंकल्या, ज्यामुळे त्यांच्या एकूण जागांची संख्या वाढली. आरजेडीने रामगड, देहरी आणि कुधनीसारख्या जागा निकराच्या लढतीत जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. गेल्या निवडणुकीत एलजेपीने मटिहानी येथे फक्त एक जागा जिंकली होती, तीही ३३३ मतांनी.
१. हिल्सा
जेडीयूचे प्रेम मुखिया उर्फ कृष्णमुरारी शरण यांनी ही जागा फक्त १२ मतांनी जिंकली. त्यांनी आरजेडीच्या अत्री मुनी यांचा पराभव केला. कृष्णमुरारी शरण यांना ६१८४८ मते मिळाली. त्याच वेळी, अत्री मुनींना ६१८३६ मते मिळाली. या जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. २०१५ च्या निवडणुकीत अत्री मुनींनी ही जागा २५ हजार मतांनी जिंकली.
२. बारबीघा
जेडीयूचे सुदर्शन कुमार यांनी ही जागा ११३ मतांनी जिंकली. त्यांनी काँग्रेसचे गजानंद शाही यांचा पराभव केला. सुदर्शन कुमार यांना ३९८७८ मते मिळाली आणि गजानंद शाही यांना ३९७६५ मते मिळाली. या जागेसाठी १० उमेदवार रिंगणात होते.
३. रामगड
राजद नेते सुधाकर सिंह यांनी ही जागा १८९ मतांनी जिंकली. त्यांनी बसपा नेत्या अंबिका यादव यांचा पराभव केला.
४. मटिहानी
लोजपाचे राजकुमार सिंह यांनी ही जागा ३३३ मतांनी जिंकली. त्यांना ६०,६८८ मते मिळाली. त्यांनी जेडीयूचे नरेंद्र कुमार सिंग उर्फ बोगो सिंग यांचा पराभव केला, ज्यांना ६०,६२३ मते मिळाली.
५. भोर
जेडीयूचे सुनील कुमार यांनी ही जागा ४६२ मतांनी जिंकली. सुनील कुमार यांना ७४०६७ मते मिळाली. त्याच वेळी, सीपीआय (एम) (एल) चे जितेंद्र पासवान दुसऱ्या स्थानावर होते, ज्यांना ७३६०५ मते मिळाली.
६. देहरी
राजद उमेदवार फतेह बहादूर सिंग यांनी ही जागा ४६४ मतांनी जिंकली. त्यांनी भाजप उमेदवार सत्यनारायण यादव यांचा पराभव केला.
७. बछवाडा
भाजपचे सुरेंद्र मेहता यांनी ही जागा ४८४ मतांनी जिंकली. त्यांना ५४,७३८ मते मिळाली. त्याच वेळी, सीपीआय नेत्याला ५४,२५४ मते मिळाली.
८. चकाई
अपक्ष सुमित कुमार सिंग यांनी ही जागा ५८१ मतांनी जिंकली. येथे आरजेडी उमेदवार सावित्री देवी यांना ४४,९६७ मते मिळाली, तर सुमित कुमार सिंह यांना ४५,५४८ मते मिळाली.
९. बखरी
माकपा उमेदवार सूर्यकांत पासवान यांनी ही जागा ७७७ मतांनी जिंकली. त्यांनी भाजप उमेदवार राम शंकर पासवान यांचा पराभव केला. सूर्यकांत पासवान यांना ७२१७७ मते मिळाली आणि राम शंकर पासवान यांना ७१४०० मते मिळाली.
१०. कुधनी
आरजेडी उमेदवार केदार गुप्ता यांनी ही जागा ७१२ मतांनी जिंकली. त्यांनी भाजपचे केदार प्रसाद गुप्ता यांचा पराभव केला. आरजेडीचे अनिल कुमार यांना ७८५४९ मते मिळाली तर केदार प्रसाद गुप्ता यांना ७७८३७ मते मिळाली.
११. परबट्टा
जेडीयू उमेदवार डॉ. संजीव कुमार यांनी ही जागा ९५१ मतांनी जिंकली. त्यांना ७७२२६ मते मिळाली. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राजदचे दिगंबर प्रसाद तिवारी यांना ७६२७५ मते मिळाली.