देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो कालव्यात कोसळून ११ भाविकांचा मृत्यू, अख्खं कुटुंंब संपलं
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी एक भीषण अपघात घडला. इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरातील बेलवा बहुता माजरा रेहरा येथे एक बोलेरो नियंत्रण सुटून कालव्यात कोसळली. यात ११ भाविकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ९ जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मोतीगंज पोलीस स्टेशन परिसरातील सिहागाव येथील भाविक बोलेरोमधून खरगुपूर येथील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी जात होते. मात्र इटियाथोक येथे बोलेरो अचानक शरयूच्या कालव्यात कोसळली, ज्यात ११ जणांचा जागीच बुडून मृत्यू झाला.
बोलेरोमध्ये १५ जण होते
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोत महिला आणि मुलांसह एकूण १५ जण होते. बोलेरो बेलवा बहुता माजरा रेहरा येथे पोहोचताच चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट शरयूच्या कालव्यात कोसळली. रस्त्याने जाणाऱ्यांनी आणि ग्रामस्थांची याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच इटियाथोक पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
#WATCH | Uttar Pradesh: 11 people died after their vehicle fell into a canal under Itia Thok Police Station limits in Gonda. The vehicle had 15 passengers onboard and they were going to Prithvinath Temple to offer prayers. CM Yogi Adityanath has announced compensation of Rs 5… pic.twitter.com/qePfWaUbK6
— ANI (@ANI) August 3, 2025
मृतांमध्ये पुरुष, महिला आणि मुले यांचा समावेश आहे. उर्वरित चार जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.