रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले (फोटो सौजन्य-X)
New Delhi Railway Station Stampede News in Marathi : १५ फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. त्याचा तपास अहवाल आता उच्चस्तरीय समितीने सादर केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत या उच्चस्तरीय चौकशी अहवालाचा उल्लेखही केला आहे. या अहवालाचा हवाला देत त्यांनी अपघाताचे कारणही सांगितले आहे.
१५ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाच्या डोक्यावर खूप जड सामान पडल्याने गोंधळ झाला. या गोंधळाने काही वेळातच चेंगराचेंगरी झाली आणि या अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती अहवालातून समोर आली.
नवी दिल्ली स्थानकातील चेंगराचेंगरी संदर्भात संसदेत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. अहवालात म्हटले आहे की, हा अपघात रात्री ८:४८ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १४/१५ ला जोडणाऱ्या पादचारी पूल-३ च्या पायऱ्यांवर झाला. अपघाताच्या वेळी, प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अहवालानुसार अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन चालत होते. त्यामुळे प्रवाशांना पादचारी पूलवरून सहज चालणे कठीण होत होते. यादरम्यान, एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड सामान पडले, ज्यामुळे पादचारी पुलावरील दाब वाढला. प्रवासी एकमेकांवर पडू लागले. अहवालात म्हटले आहे की, ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४/१५ च्या पायऱ्यांपुरती मर्यादित होती.
शवविच्छेदन अहवालानुसार प्रवाशांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. चौकशी अहवालात असे दिसून आले आहे की, गर्दी व्यवस्थापनासाठी पुरेसे प्रोटोकॉल होते, तरीही रात्री ८.१५ नंतर पादचारी पुलावरील प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली. समितीला असे आढळून आले आहे की अपघातापूर्वी अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे लोकांना २५ फूट रुंदीच्या अरुंद पादचारी पुलावरून प्रवास करण्यात अडचण येऊ लागली.
अपघाताच्या वेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की रेल्वेने त्या संध्याकाळी १,५०० प्रति तास या दराने ७,६०० अनारक्षित तिकिटे विकली होती. संध्याकाळी ६ नंतर गर्दी वाढू लागली.
याशिवाय रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, १२ मीटर आणि ६ मीटर रुंदीचे फूट ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी दोन नवीन डिझाइन तयार करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मदतीने महाकुंभात गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात आले. आता सर्व स्थानकांवर असे फूट ओव्हर ब्रिज बांधले जातील. याशिवाय, सर्व प्रमुख स्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्टेशन डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली जाईल. इतर सर्व विभाग थेट स्टेशन डायरेक्टरला रिपोर्ट करतील. आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन डायरेक्टरला त्वरित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देखील असेल, अशी माहिती संसदेत देण्यात आली.