पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर सरकारची कारवाई, 7 पोलिस बडतर्फ!

पंजाबमध्ये सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक केल्याप्रकरणी सात पंजाब बडतर्फ केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी पंजाबला भेट दिली.

  पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एसपी गुरविंदर सिंग संगासह 7 पोलिस कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने हा निर्णय घेतला आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घातला होता.

  काय होतं नेमकं प्रकरण?

  पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी ५ जानेवारीला पंजाब दौऱ्यावर होते. निवडणुकीच्या काळात ते सभा घेणार होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घातल्याने पंतप्रधान मोदींचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावर थांबवण्यात आला. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

  भाजपचा चन्नी सरकारला आरोप

  या घटनेला तत्कालीन काँग्रेसचे चरणजीत चन्नी सरकार जबाबदार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला होता. किमान काँग्रेस सरकारने देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तरी सावध असायला हवे होते. काँग्रेस सरकारचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आल्याने ही समस्या समोर आली आहे. यानंतर पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षेत विमानतळावर नेण्यात आले.

  भगवंत मान सरकारने केली कारवाई

  सध्या आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने याप्रकरणी कारवाई केली आहे. कारवाई करत सरकारने एसपीसह सात पोलिसांना बडतर्फ केले आहे. सरकारने फिरोजपूरचे तत्कालीन एसपी गुरविंदर सिंग सांगा, डीएसपी परसन सिंग, डीएसपी जगदीश कुमार तसेच इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग, बलविंदर सिंग, जसवंत सिंग आणि एएसआय राकेश कुमार यांना बडतर्फ केले आहे. पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याबद्दल या सर्व पोलिसांवर कारवाई केली आहे. गुरविंदर सिंग संगा हे त्यावेळी भटिंडा जिल्ह्यात एसपी म्हणून तैनात होते.