फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून संपर्क करून घटनेचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आणि शोकग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वारंवार होणाऱ्या घटनांमुळे फटाके कारखान्यांमधील सुरक्षा मानकांच्या स्थितीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही अनकापल्ले जिल्ह्यात अनधिकृत फटाके कारखान्यांमध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये सुरक्षा उपायांचा अभाव आणि तपासणीतील निष्काळजीपणा ही या अपघातांमागील मुख्य कारणे मानली जातात.
पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारांसाठी विशाखापट्टणम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारखान्याचा परवाना आणि सुरक्षा उपायांची चौकशी केली जात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अपघाताच्या वेळी कारखान्यात ३० हून अधिक कामगार काम करत होते. दरम्यान २० हून अधिक कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे. याआधी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मोठे स्फोट झाले आहेत.