संबलपुर : गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे अपघाताची (Railway Accident) संख्या वाढताना दिसत आहे. त्यात आता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या संबलपूर विभागातील कांताबंजी स्टेशनजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरून अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, इतर रेल्वेगाड्यांवर याचा परिणाम झाला. अनेक गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली.
जेव्हा या मालगाडीचे डबे घसरले ज्यामुळे दोन्ही ट्रॅकवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. खराब झालेले डबे काढून टाकल्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायपूर-तितलागड एक्स्प्रेस आणि जुनागढ रोड-रायपूर एक्स्प्रेस शनिवारसाठी रद्द करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, महाराष्ट्रातील पालघरमध्ये तीन दिवसांपूर्वी मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले होते. त्यामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला होता. पश्चिम रेल्वेने मुंबईच्या काही लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या. तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले होते. आता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या संबलपूर विभागातील कांताबंजी स्टेशनजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले आहेत.