आपने आतिशींवर सोपवली मोठी जबाबदारी; विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी पक्ष मुख्यालयात बोलावलेल्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलं. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली.
Sharad Pawar : राजकारणी साहित्य संमेलनात कशासाठी येतात? शरद पवारांनी थेट सांगितलं
आतिशी आता दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतील. त्या कालका मतदारसंघाच्या आमदार आहेत. आप सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या कामामुळे पक्षातही त्यांचा लौकिक वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण आतिशी कालकाची आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाल्या. पक्षातील एक मजबूत महिला चेहरा असल्याने, बैठकीत आतिशी यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते.
आम आदमी पक्षाने महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा महिला चेहरा म्हणून आतिशी यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने शालीमार बागच्या आमदार रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षात विचारमंथन सुरू असून कुठे चुकलं याचा आढावा घेतला जात आहे. पराभवाच्या कारणांचे तांत्रिक पैलू समजून घेण्यासाठी, आम आदमी पक्ष लोकसभा, विधानसभा, जिल्हा आणि वॉर्ड पातळीवरील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे मूल्यांकन करण्यासाठी ऑडिट करण्याची तयारी करत आहे.
आम आदमी पार्टी दिल्लीचे राज्य संयोजक गोपाल राय म्हणतात की आता संघटनेच्या सर्व शाखांची पुनर्रचना केली जाईल, संपूर्ण दिल्लीत ती आणखी मजबूत करण्यासाठी रणनीती आखली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.