uttarakhand government tested kedarnath Badrinath prasad
उत्तराखंड : देशामध्ये सध्या तिरुपती बालाजीच्या प्रसादावरुन रान उठले आहे. प्रसादामध्ये माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर भाविकांनी रोष व्यक्त केला. प्रसादासारख्या पवित्र पदार्थामध्ये देखील भेसळ समोर आल्यामुळे देशभरामध्ये या प्रकरणावर चर्चा रंगल्या आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय देखील जागे झाले. मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर बनावट मिठाई आणि भेसळयुक्त तूप व खवा बनवणाऱ्या जागांवर छापेमारी करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळापूर्वी हे भेसळयुक्त मिठाई बनवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न समोर आला आहे. आता तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादातील धक्कादायक भेसळ समोर आल्यानंतर उत्तराखंड प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त एफडीए ताजबर सिंग जग्गी यांनी मंगळवारी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधून अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अन्न सुरक्षा विभागाला उत्तराखंडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मिठाई, तूप आणि बटरचे नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून सुरू झालेली कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. राज्यातील सर्व ब्रँड देशी तूप, लोणी आणि मिठाईमध्ये भेसळ आहे की नाही याची चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रसाद आणि मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना चाचणी करुन तपासले जाणार आहे.
उत्तराखंड सरकार घेणार काळजी
त्याचबरोबर उत्तराखंडमधील प्रमुख मंदिराच्या प्रसादाची चाचणी केली जाणार आहे. याबाबत उत्तराखंडचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी निर्णय घेतला असून माहिती दिली आहे. या चाचण्यांमध्ये केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम आणि इतर मंदिरांसारख्या राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये प्रसादाचा नमुना घेण्यात येणार आहे. देशभरातून लाखो भाविक या मंदिरांना भेटी देत असतात. त्यामुळे आता तिरुपतीनंतर उत्तराखंडमधील मंदिरांमध्ये वाटण्यात येणारा प्रसाद हा पूर्णपणे शुद्ध आणि धार्मिक श्रद्धेनुसार असल्याची खात्री सरकारकडून करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : भारत प्रथमच बनला आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश; सुपर पॉवर रशिया आणि जपानलाही मागे टाकले
भविष्यात वाद होऊ नये म्हणून चाचणी…
उत्तराखंडचे सांस्कृतिक मंत्री सतपाल म्हणाले की, “उत्तराखंडमध्ये हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरं असून लाखो भाविक दरवर्षी येत असतात. त्यामुळे सर्व प्रमुख मंदिरांमध्ये बनवलेल्या आणि वाटण्यात येणाऱ्या प्रसादाचे नमुने घेण्यात येणार आहेत. मंदिरांमधून नमुने गोळा करून त्यांची चाचणी करण्यासाठी विशेष पथके तयार केली जाणार आहेत. या चाचणीमध्ये प्रसादाची सामग्री, त्याची गुणवत्ता आणि धार्मिक नियमांचे पालन यावर विशेष लक्ष दिले जाईल. आमच्या राज्यात भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. भाविकांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असून याची आम्ही काळजी घेत आहोत,” असे मत उत्तराखंडच्या मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.