दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून उद्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लोकसभेच्या निकालामध्ये भाजपला बहुमत मिळाले नसले तरी एनडीएच्या घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले जाणार आहे. राज्यामध्ये अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट यांनी देखील महायुतीमध्ये सहभाग घेतला होता. एनडीएच्या संसदीय बैठकीला देखील अजित पवार व एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यामुळे या दोन्ही गटाला केंद्रीय मंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अजित पवार गटाचे मंत्रीपदाचे उमेदवार ठरले असून प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रात अजित पवारांची ‘पॉवर’
यंदा लोकसभा निवडणूक राज्यामध्ये अजित पवार गट व शिंदे गट हे भाजपच्या साथीने लढवली. यामध्ये अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली. बारामती व शिरुर या प्रतिष्ठित मतदारसंघामध्ये देखील अजित पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र तरी देखील अजित पवार गटाची ताकद केंद्रामध्ये दिसून आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये अजित पवार गटाला एक मंत्रिपद आले आहे. अजित पवार गटाची दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली असून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.
प्रफुल्ल पटेल यांचा नावावर शिक्कामोर्तब
लोकसभा निकालानंतर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरु झाल्या. एनडीए घटक पक्षांच्या साथीने मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. उद्या राष्ट्रपती भवन येथे सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी यांचा तिसरा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून यावेळी कोणा कोणाला मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अजित पवार गटाला एक जागा मिळणार आहे. या जागी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेमध्ये सुनील तटकरे यांचा विजय झाला असला तरी प्रफुल्ल पटेल यांच्या अनुभवाचा त्यांना फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.