: पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) दणका दिला आहे. ईडीने मुंबईत नीरव मोदीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव आयोजित केला होता. दोन दिवस झालेल्या या लिलावात (Auction) फरार व्यापारी नीरव मोदीकडून जप्त करण्यात आलेल्या लक्झरी वस्तूंची विक्री केली गेली. या विक्रीतून २.७१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सेफ्रोनर्ट या ऑक्शन हाउसच्या (Saffronart Auction House) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नीरव मोदी हा फसवणूक, भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंगसारखे विविध आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत सीबीआय आणि ईडीने त्याच्या भारतातील विविध मालमत्तांवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता आणि इतर महागड्या वस्तूंचा लिलाव करून काही प्रमाणात घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
१ आणि २ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात २७ लॉटचा समावेश होता. लिलाव झालेल्या वस्तूंमध्ये दुर्मिळ आणि महागडी घड्याळे, पेंटिंग्ज आणि डिझायनर हँडबॅग्जचा समावेश होता. ‘आम्ही ठेवलेल्या लिलावात १०० टक्के लॉटची विक्री होऊन ‘व्हाईट ग्लोव्ह’ साध्य झाल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे, असे सेफ्रोनार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह-संस्थापक दिनेश वझिरानी यांनी सांगितले.
डेसमंड लाझारो पेंटिंग २२ लाख ३८ हजार ६५६ रुपयांना विकले गेले. त्याला साधारणपणे सहा ते आठ लाख रुपयांची बोली लागेल, असा अंदाज होता. पण ते तिप्पट किमतीत विकले गेले. हर्मीस, शेनेल, लुई व्हिटॉन, बोटेगा व्हेनेटा आणि गोयार्ड यासारख्या लक्झरी ब्रँडच्या बॅगचादेखील लिलाव करण्यात आला. यापैकी पॅलेडियम हार्डवेअर आणि स्कार्फ असलेली हर्मिस केली ब्लू अॅटोल या बॅगला १२ लाख ९१ हजार ३६० रुपयांची सर्वाधिक बोली लागली. सोन्याचे आवरण असलेली लेदर हर्मीस बिर्किन बॅग (Hermes Birkin Bag) ११ लाख ९ हजार ९२० रुपयांना विकली गेली. बर्किन बॅग्ज त्यांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे सर्वांत जास्त मागणी असलेल्या फॅशन अॅक्सेसरीजपैकी एक आहेत. प्रत्येक बर्किन बॅग हाताने शिवलेली, बफ केलेली, पेंट केलेली आणि पॉलिश केलेली असते.