Bihar News: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मीती करताना दिसत आहे. काल बिहारमधील मधुबनी येथे राहुल-तेजस्वी यांची मतदार हक्क यात्रा पोहचली. या यात्रेचा ताफा जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा इंडिया आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. नेत्यांच्या सामील होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राजकारणही तापले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार हक्क यात्रेत भाग घेतला.
ययावेळी जनतेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. भाजपने देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले आहेत. प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आणि म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते की जर काँग्रेसचे लोक सत्तेत आले तर ते मंगळसूत्र, म्हशी चोरतील, पण म्हशी विसरून जा, त्यांनी तुमची मते चोरली. जर तुम्ही मतदान करण्याची शक्ती गमावली तर समजून घ्या की रेशन कार्डसह सर्व योजनांमधून तुमचा हक्क काढून घेतला जाईल. म्हणून मत चोरी होऊ देऊ नका.” असे म्हणत प्रियंका गांधींनी थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
तर, राहुल गांधी यांनी अमित शाह आणि जातीय जनगणनेबाबत भाष्य केलं. मागील काही काळापासून अमित शाह सातत्याने ‘भाजप देशात पुढचे ५० वर्षे सत्तेत राहिल,’ असा दावा करत आहेत. अमित शाहा यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘अमित शाहांचे हे विधान खूपच विचित्र आहे. मला कायम प्रश्न पडायचा, यांना कसं माहिती ४-५० वर्षे हे सत्तेत राहतील. पण आता सत्य देशासमोर आले आहे की हे सरकार जनतेच्या मतांची चोरी करत आहे. केंद्रातील मोदी सरकार तुमची मते चोरून, लोकांचे रेशनकार्ड, जमीन आणि हक्क हिसकावून घेऊन तुमच्यावर राज्य करण्याचा डाव आहे. पण मी असे होऊ देणार नाही, बि इच्छितात, परंतु ते हे होऊ देणार नाहीत. बिहारच्या तरुणांच्या पाठिंब्यानंतर आता “मोदी-शाह आणि निवडणूक आयोग मते चोरण्यापूर्वी दोनदा विचार करतील” असा दावा त्यांनी केला. राहुल यांनी असेही आश्वासन दिले की जर त्यांचे सरकार आले तर प्रथम जातीय जनगणना होईल आणि नंतर आरक्षण मर्यादा रद्द केली जाईल.
मी खुली पत्रकार परिषद घेतली. पण माझ्या पत्रकार परिषदेवर भाजपच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. मोदी-शाहांनी एक शब्द नाही काढला, जेव्हा चोर पकडला जातो. तेव्हा तो पूर्णपणे शांत होतो. कारण त्याला माहिती असते आपली चोरी पकडली गेली आहे. आपण फसलो आहोत. असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेत काल प्रियंका गांधींसह दक्षिणेकडील दिग्गज नेतेही काल सामील झाल्याचे पाहायला मिळाले. तेलंगाणाचे मुख्मंत्री रेवंत रेड्डी हेदेखील सामील झाले होते. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि द्रमुक संसदीय पक्षाच्या नेत्या कनिमोझी मतदार हक्क यात्रेच्या ११ व्या दिवशी सामील होणार असल्याची माहिती आहे. पण त्याचवेळी प्रियंका गांधी आणि रेवंत रेड्डींच्या या यात्रेत सामील होण्यामुळे भाजप मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते की मतदार हक्क यात्रा ही मत चोरीविरुद्धची ऐतिहासिक चळवळ ठरत आहे. ही मोहीम केवळ बिहारपुरती मर्यादित नसून संपूर्ण देशातील लोकांना आकर्षित करत असल्याचा त्यांचा दावा आहे. या यात्रेत काँग्रेससह इंडिया ब्लॉकमधील प्रमुख नेते सहभागी होत आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे नुकतेच बिहारमध्ये पोहोचले आणि या यात्रेत सामील झाले. राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्यासोबत इतर विरोधी नेत्यांची यात्रेत सहभागी होण्याची मालिका सुरू आहे.