नवी दिल्ली: भाजपने (BJP) 2024 ची निवडणूक ज्येष्ठ नेते आणि विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (jp nadda) यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. नड्डा आता जून 2024 पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. 2019 मध्ये नड्डा यांची पहिल्यांदाच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाध्यक्ष म्हणून नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ या वर्षी जानेवारीत संपत आहे. या बातमीनंतर लोक नड्डा यांच्याबद्दल इंटरनेटवर अनेक गोष्टी शोधत आहेत. यामध्ये नड्डा यांच्या पत्नीपासून ते मुलांपर्यंत, त्यांच्या घरापासून त्यांच्या फेसबुक प्रोफाइलपर्यंतचा समावेश आहे. नड्डा यांच्याशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
बिहार राज्याचे प्रतिनिधित्व
जेपी नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी पाटणा येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील नारायण लाल नड्डा पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नड्डा यांनी आपले प्रारंभिक शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल, पटना येथून पुर्ण केले. नंतर नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातून एलएलबीचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात नड्डा यांनी अखिल भारतीय जलतरण स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केले. 1991 मध्ये त्यांनी डॉ. मल्लिका नड्डा यांच्याशी लग्न केले. नड्डा यांच्या पत्नी सध्या हिमाचल प्रदेश विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापक आहेत. जेपी नड्डा यांना दोन मुलगे आहेत. नड्डा यांच्या सासू जयश्री बॅनर्जी या मध्य प्रदेशातील जबलपूरमधून लोकसभेच्या खासदार आहेत. जेपी नड्डा यांचे दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्ग 7 बी येथे निवासस्थान आहे. 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार जेपी नड्डा यांच्याकडे 3 कोटी 49 लाख रुपयांची संपत्ती आहे.
अवघ्या 29 वर्षात झाले निवडणूक प्रभारी
नड्डा यांनी 1975 मध्ये संपूर्ण क्रांती आंदोलनातून राजकारणाला सुरुवात केली. त्यावेळच्या इंदिरा गांधींच्या राजवटीविरुद्ध जेपींनी हे आंदोलन सुरू केले होते. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाले. नड्डा यांचे वडील पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू होते. 1977 मध्ये त्यांनी पाटणा विद्यापीठात अभाविपच्या वतीने सचिवपदासाठी निवडणूक जिंकली. यादरम्यान त्यांनी अभाविपमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नड्डा यांना भाजप युवा शाखेचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले. त्यावेळी नड्डा केवळ 29 वर्षांचे होते. वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी नड्डा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले.
हिमाचल प्रदेशमधून तीन वेळा खासदार
जेपी नड्डा यांनी पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली. नड्डा यांनी तीनदा निवडणूक जिंकली. नड्डा हे हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळातही मंत्री होते. 2012 मध्ये नड्डा राज्यसभेवर निवडून आले. 2014 मध्ये पक्षाने नड्डा यांच्याकडे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. 2019 पर्यंत ते या पदावर होते. नड्डा यांनी दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम केले आहे.