डिजिटल अरेस्टप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात छापेमारी
नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आता गरजेचे बनले आहे. याच वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, CBI ने बुधवारी (दि.8) देशभरात मोठे छापे टाकले. दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात छापेमारीची कारवाई करण्यात आली.
डिजिटल अरेस्ट फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये एजन्सीने एकाच वेळी दिल्ली-NCR, हरियाणा, राजस्थान, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई ऑपरेशन चक्र-5 अंतर्गत करण्यात आली. I4C (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर) च्या NCRP पोर्टलवर नऊ जणांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींद्वारे CBI ला हे प्रकरण प्राप्त झाले. तक्रारींच्या आधारे, CBI ने FIR नोंदवून तपास सुरू केला. या फसवणुकीत अनेक बनावट बँक खाती आणि टेलिकॉम नेटवर्क वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले, ज्याद्वारे आरोपी संबंधितांपर्यंत पोहोचले होते.
हेदेखील वाचा : Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
आरोपींनी स्वतःला पोलिस किंवा सरकारी एजन्सी अधिकारी म्हणून सादर केले होते. या फसवणुकीत, आरोपींनी पोलिस किंवा सरकारी एजन्सी अधिकारी म्हणून ओळख करून लोकांना फोन केल्याचे समोर आले. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरले गेले आहे. त्यानंतर ते त्यांना धमकावून पैसे उकळायचे. हे व्हिडिओ कॉल, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे केले जात असे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
कंबोडियातून ऑपरेट केलं जात होतं नेटवर्क
कंबोडियातून ही कारवाई करण्यात येत होती. तपासादरम्यान, सीबीआयने या सायबर टोळीशी संबंधित सुमारे 40 व्यक्तींची ओळख पटवली. 15000 हून अधिक आयपी अॅड्रेसच्या विश्लेषणातून असे दिसून आले की संपूर्ण फसवणूक ऑपरेशन परदेशातून, प्रामुख्याने कंबोडियामधून चालवली जात होती.
काही भागांत भारतातून तर काही भाग…
दरम्यान, भारतातील व्यक्ती बनावट खाती उघडून आणि हवाला चॅनेल वापरून पैसा जमवला जात होता. त्यानंतर हा पैसा हस्तांतरण करण्यात ते मदत करत होते. पैशाचा काही भाग भारतात काढण्यात आला, तर उर्वरित रक्कम परदेशी एटीएममधून काढण्यात आली. आरोपींनी हा पैसा हलविण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्म आणि डिजिटल ट्रान्सफर सेवांचा वापर केला, जेणेकरून व्यवहार ट्रॅक करता येणार नाहीत.
अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त
छापा मारताना, सीबीआयने लॅपटॉप, मोबाईल फोन, हार्ड ड्राइव्ह, केवायसी कागदपत्रे आणि अनेक सिम कार्ड जप्त केले. मुख्य कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी या सर्व यंत्रणांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.