जम्मू-काश्मीरच्या दोडा येथे ढगफुटी; अनेक घरं उद्ध्वस्त, धक्कादायक व्हिडिओ समोर
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे ढगफुटी झाली. या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोडा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, चिखल आणि दरड पडण्याच्या घटना घडल्या. ज्यामुळे अनेक रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अनेक भाग बंद करावे लागले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या पुलावरही वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. वातावरण चांगले झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे सांगण्यात आले.
#WATCH | Doda, Jammu and Kashmir | Continuous heavy rainfall across Doda district has triggered landslides, mudslides, and shooting stones, leading to the closure of several link roads as well as stretches of the national highway. pic.twitter.com/0EuHmW5XNu
— ANI (@ANI) August 26, 2025
कठुआ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी या पावसामुळे गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. याशिवाय, जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड पूल मोडकळीस आला आहे. त्यामुळे महामार्गावरील पुलावर वाहतूक थांबवण्यात आली आहे.
आयुष विभागाची इमारत कोसळली
पुरामुळे आयुष विभागाची इमारत कोसळली आहे. डोंगराळ भागात रस्ते संपर्कही ठप्प झाला आहे. पुरमंडलमधील देविका नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे एका परिसरातील धोका वाढला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा
हवामानाची परिस्थिती पाहता, पुढील 72 तास जम्मू-काश्मीरसाठी आव्हानात्मक असतील. हवामान खात्याने या काळात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने लोकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.