पावसाचा हाहा:कार ! जम्मू-काश्मीरच्या रामबन येथे ढगफुटी; तिघांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील एका दुर्गम गावात ढगफुटीची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. ही घटना रामबनच्या राजगड भागात घडली. या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस झाला आणि पाण्याचा जोरदार प्रवाह गावात शिरला.
स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मदत आणि बचाव कार्यादरम्यान दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे, ज्यामुळे डोंगराळ भागात धोका आणखी वाढला आहे. या सर्व परिस्थितीची माहिती घेता प्रशासनाने परिसरात अलर्ट जारी केला आहे.
हेदेखील वाचा : जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस; अनेक नद्यांना पूर; गावे बुडाली
याशिवाय, शनिवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातही मोठं नैसर्गिक संकट आलं. शनिवारी पहाटे रियासी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात भूस्खलनामुळे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातही बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. यातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे प्रयत्न आहेत.
मुसळधार पावसामुळे झाले भूस्खलन
माहोरच्या बद्दार गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, ज्यामुळे एक घर पूर्णपणे कोसळले. या घटनेनंतर घरमालक नजीर अहमद, त्यांची पत्नी आणि पाच अल्पवयीन मुले बेपत्ता आहेत. हे सर्व बेपत्ता असल्याने त्यांच्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या मदत आणि बचाव पथके घटनास्थळी हजर असून, बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू आहे.
परिसरात पूरसदृश परिस्थिती
आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, तर पाच जण अजूनही बेपत्ता आहेत. अचानक झालेल्या या ढगफुटीच्या घटनेमुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक घरे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.