जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस; अनेक नद्यांना पूर; गावे बुडाली
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. त्यात पंजाबमध्ये पुरामुळे कहर झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती खूपच बिकट असून, अनेक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. येथे राहणारे लोकांना सध्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहेत.
हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सतलज, व्यास आणि रावी नद्यांचे पाणी ओसंडून वाहत आहे. या नद्यांचे पाणी लांब अंतरापर्यंत निवासी भागात शिरले आहे. पठाणकोट, गुरुदासपूर, फाजिल्का, तरणतारन, कपूरथला, फिरोजपूर, होशियारपूर आणि अमृतसरमध्ये परिस्थिती वाईट आहे. सखल भागातील शेकडो गावे पूर्णपणे बुडाली आहेत. यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे, तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले.
ईशान्य भारतातील राज्यांतही मुसळधार पाऊस
ईशान्य भारतात, मेघालय, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात-सौराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस शकतो.
अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. दक्षिण भारतातही मान्सून आपला मार्ग बदलेल आणि तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, यानम, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, झारखंडमध्ये पाऊस
मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, छत्तीसगड आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशातील गोदावरीच्या पात्रात वाढ
आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत पाणी सतत वाढत आहे. त्याच वेळी, तेलंगणातील भद्राचलम येथे नदीची पाण्याची पातळी ३५.३ फूटांवर पोहोचली आहे. विनायक चतुर्थी उत्सव साजरा करणाऱ्यांना मूर्ती विसर्जन करताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.