“मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले असून आज सकाळी ते आणि आंदोलक मुंबईत आले आहेत. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको प्रकार घडले, पण पोलिसांनी समजूत घालल्यावर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले असून शासनाची सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने होत असलेल्या आंदोलनाला कुठलीही मनाई नाही,” अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक आझाद मैदानावर पोहोचले. भगवे झेंडे आणि घोषणाबाजीच्या दरम्यान इतकी मोठी गर्दी जमली की दक्षिण मुंबईतील वाहतूक ठप्प झाली. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलकांसह मुंबईच्या आझाद मैदान परिसरात आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या गर्दीमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तसेच आंदोलकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, असा आरोपही विरोधकांनी केला.
आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सरकार सर्व प्रकारची मदत देईल. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आले की काही प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. काही लोक अतिउत्साही पद्धतीने वागत असल्याने संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागू शकतो. अशा प्रकारे कुणीही वागू नये, याकडे लक्ष द्यावे लागेल. मनोज जरांगे पाटील यांनीही अलोकतांत्रिक किंवा आडमुठे पद्धतीने वागू नये, असे आवाहन केले आहे.”
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. पण आता किती दिवस आंदोलन चालणार? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. पण त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पोलीस पालन करतील. पण हा प्रश्न आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील आहे.
मारा..जोरात मारा..तोडून टाका; कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, राहुल गांधींची पोस्ट चर्चेत
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी आल्यानंतर विरोधकांची भूमिका बदलली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सकाळपासून होणारी विरोधकांची विधाने त्यांनी ऐकली असल्याचे सांगत, “विरोधकांना यातून राजकीय पोळी भाजायची आहे, पण यात त्यांचेच तोंड भाजले जाईल,” असेही त्यांनी टीका केली. सरकारचा हेतू मराठा आणि ओबीसी समाजांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा नाही. सरकार दोन्ही समाजांच्या हिताची काळजी घेईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची हमी देईल.
तसेच, त्यांच्या सरकारने आतापर्यंत मराठा समाजाच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले, “सत्तेत असताना मराठा समाजाचे प्रश्न कधी सोडवले गेले? आमच्याशिवाय या प्रश्नांवर ठोस पावले कोणी उचलली?”असा प्रतिप्रश्नही फडणवीसांनी विरोधकांना केला.