वेटेनरी सायंसच्या शिक्षणापासून RSSच्या सरसंघचालकापर्यंत; कसा आहे मोहन भागवतांचा प्रवास?
Who is Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका समारंभात, RSS प्रमुख मोहन भागवत यांनी प्रजनन दरापासून शिक्षणपद्धतीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी फिनलंड देशाच्या शिक्षणपद्धतीकडे लक्ष वेधलं. ‘फिनलंड हा शिक्षण क्षेत्रात एक आघाडीचा देश आहे, जिथे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ आहे. लोक परदेशातूनही येतात आणि स्थानिक लोकसंख्या कमी असल्याने सर्व देशांतील विद्यार्थ्यांना तेथे स्वीकारले जाते. फिनलंडमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत दिले जाते. गुरुकुल शिक्षणाचा अर्थ असा नाही की एखाद्याला आश्रमात जाऊन राहावे लागेल.”
देशातील एक शक्तिशाली व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली विधाने आणि मते मांडत असतात. पण त्यांच्या या विधानांमुळे देशात अनेकदा वाद निर्माण होतात. अशातच देशात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी कोणती पदवी घेतली आहे किंवा ते किती शिक्षित आहेत?.याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
मोहन भागवत शैक्षणिक पात्रता
मोहन भागवत यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ते त्यांच्या पालकांचे मोठे पुत्र आहेत. मोहन भागवत हे आरएसएस कार्यकर्त्यांच्या कुटुंबातून येतात. मोहन भागवत यांनी त्यांचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथूनच पूर्ण केले. लोकमान्य टिळक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जनता महाविद्यालयात बीएससीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी त्याच विषयात पीजीमध्ये प्रवेश घेतला. पण त्यांनी पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून संघात प्रवेश केला आणि संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. त्यानंतर ते संघात काम करत राहिले.
आणीबाणीच्या काळात मोहन भागवत भूमिगत काम करत होते. १९७७ मध्ये ते अकोल्याचे प्रचारक झाले. त्यानंतर ते काम करत राहिले आणि त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. २००९ मध्ये त्यांना संघाचे संघप्रमुख बनवण्यात आले. २१ मार्च २००९ रोजी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत हे पद सांभाळत आहेत.
Fertility Rate In India: ३ मुलांच्या मॉडेलनं प्रजनन दरावर काय परिणाम; कसे असेल प्रजनन दराचे गणित?
आणीबाणीच्या काळात भूमिगत राहिल्यानंतर मोहन भागवत १९७७ मध्ये अकोल्याचे प्रचारक बनले. त्यानंतर त्यांनी नागपूर आणि विदर्भ प्रदेशासाठी संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत संघात महत्त्वाची भूमिका निभावली. २१ मार्च २००९ रोजी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून निवड झाली. के.बी. हेडगेवार आणि एम.एस. गोळवलकर यांच्यानंतर ते संघाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण प्रमुख ठरले.
२०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात अधिकृत निमंत्रण दिलेले भागवत हे पहिले आरएसएस प्रमुख ठरले. तर सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे तीन दिवसांच्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. या कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केले की संघाने एम.एस. गोळवलकर यांच्या विचारसरणीतील काही भाग वगळले आहेत, कारण ते सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत नव्हते.