DGCA च्या विमान कंपन्यांना महत्त्वाचा निर्णय; सर्व विमानांमधील इंजिन फ्युएल स्विचची सक्तीने तपासणी करण्याचे आदेश
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विमान अपघात अन्वेषण विभागाने (AAIB) दिलेल्या प्राथमिक अहवालाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. DGCA ने भारतात नोंदणीकृत असलेल्या सर्व विमानांवरील इंजिन फ्युएल स्विचची सक्तीची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही तपासणी 21 जुलै 2025 या अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
Mumbai Plane Accident Breaking: मुंबई एअरपोर्टवर मोठा अपघात! मालवाहू ट्रकची विमानाला धडक अन्…
ही तपासणी संबंधित विमानाच्या डिझाईन किंवा उत्पादन करणाऱ्या देशांनी जारी केलेल्या विमान योग्यतेच्या निर्देशाच्या आधारे केली जात आहे. त्यामुळे भारतातील सर्व विमाने, त्यांचे इंजिन्स आणि संबंधित घटक यांच्यासाठी हा आदेश लागू होणार आहे, असं DGCA ने स्पष्ट केलं आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान कंपन्यांनी AAIB च्या सूचनांनुसार त्यांच्या ताफ्यातील विमानांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे सर्व संबंधित विमान कंपन्यांनी 21 जुलैपूर्वी तपासणी पूर्ण करावी आणि त्यानंतरची तपासणी अहवाल DGCA च्या प्रादेशिक कार्यालयात सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट AI171 चा अपघात झाला होता. त्या अपघातात सहभागी असलेल्या विमान VT-ANB च्या 2023 पासूनच्या देखभाल नोंदी व्यवस्थित होत्या आणि त्याच्या सर्व वैध तपासण्या झाल्या होत्या, हे प्राथमिक अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मात्र या अहवालात एक धक्कादायक बाब पुढे आली, अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो की त्याने इंजिनचं फ्युएल का बंद केलं, तर दुसऱ्या पायलटने त्याने बंद केलं नसल्याचं सांगितलं. यामुळे फ्युएल स्विच आणि त्यांच्या लॉकिंग यंत्रणेवर संशय उपस्थित झाला आहे.
याच अनुषंगाने, जगभरातील प्रमुख विमान कंपन्यांनी बोइंग 787 प्रकारातील फ्युएल स्विचेसच्या लॉकिंग प्रणालींची तपासणी सुरू केली आहे. ऐतिहाद एअरवेजने तर त्यांच्या इंजिनियर्सना यासंदर्भात तातडीने तपासणीचे निर्देश दिले असून इतर अनेक कंपन्यांनीही अशीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.