गुवाहाटी : आसाममधील धुबरी जिल्ह्यात रविवारी पहाटे भूकंप (Earthquake in Assam) झाल्याची माहिती दिली जात आहे. रविवारी पहाटे आसामच्या धुबरी जिल्ह्यात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हा भूकंप मध्यरात्री 3:01 वाजता झाला. तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी सहा वाजता मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातही भूकंप झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आसाममध्ये भूकंप झाला.
सिवनी येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 1.8 एवढी होती. त्याआधी शुक्रवारी संध्याकाळी ६.४७ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.9 इतकी मोजली गेली. या सर्व परिस्थितीत आता भूकंप येण्यापूर्वीच तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहे. त्यानुसार, भूकंपामुळे होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता येणार आहे.
गुगलने बुधवारी (दि.२७) भारतात भूकंपाची सूचना देणारी यंत्रणा सुरू करणार असल्याची माहिती दिली. ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोनमधील सेन्सर वापरून भूकंपाचा अंदाज घेण्याचे आणि त्याची तीव्रता ओळखण्याचे काम करणार आहे. या सेवेच्या मदतीने भूकंप होताच लोकांना सतर्क केले जाईल, जेणेकरून लोक त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करू शकतील. आसाममध्ये झालेल्या या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.