मुंबई : शिक्षणतज्ञ सुधा मूर्ती (Sudha Murty) या प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. भारताचे सॉफ्टवेअर अब्जाधीश एन. आर. नारायण मूर्ती (Narayan Murty) यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान झाल्यापासून, त्यांची प्रत्येक हालचाल सार्वजनिक चर्चेचा मुद्दा बनली आहे. सध्या सुद्धा मुर्ती त्यांच्या सोशल मीडियावरील एका विधानामुळे चर्चेत आहेत.
एक प्रसिद्ध शो ‘खाने में क्या रखा है?’ या शो मधील सुधा मुर्ती यांच्या विधानानंतर सलग तीन दिवस त्यांच्याच नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांनी स्वत:चे वर्णन ‘शुद्ध शाकाहारी’ म्हणून केले असून, अंडीही खात नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा त्या परदेशात जातात तेव्हा त्या स्वतःचे जेवण सोबत घेतात आणि सर्वात मोठी भीती असते की चमचाचा वापर शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी केला जाऊ नये’.
तसेच ‘मी जेव्हा प्रवास करते तेव्हा मी शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट शोधते आणि मी माझ्यासोबत जेवणाच्या पूर्ण पिशव्या घेऊन जातो. काही दशकांपूर्वी जेव्हा माझ्या आजी त्यांच्याबरोबर जेवण घेऊन जायच्या, तेव्हा मी त्यांची गंमत करत असे. मी त्यांना विचारायची की तिथं जेवण मिळत असताना असं का करता, पण आता मी देखील असेच करते’.
दरम्यान, त्यांच्या याच विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे अनेकजण पुढे आले आहेत.