
cm eknath shinde again on huwahati tour
गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून प्रचाराचा धडाका उडाला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी वारी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापूर्वी बंडेखोरीवेळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यामध्ये येऊन भाजपाच्या साथीने त्यांनी सरकार स्थापन केले. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी जात कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे.
गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आता कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली असून लवकरच दुसरी यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यामध्ये महायुती मोठ्या ताकदीने आणि जल्लोषात विजयी होणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये व्यक्त केला आहे.