माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला निषेध.
जम्मू: जम्मू-काश्मिरमध्ये 10 वर्षांनी विधानसभा निवडणुक झाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांच्या नेतृत्वीखाली नवे सरकार स्थापन झाले. यानंतरही जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. गेल्या 15 दिवसांत अनेक दहशतवादी हल्ले झाले. या हल्लयांनतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.
आता हिसांचाराचा अंत करणे आवश्यक
फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल पाकिस्तानचा निषेध केला. त्यांनी गुलमर्ग दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यावर मोठे वक्त्यव्य केले. फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान मैत्रीचा मार्ग शोधत नाहीत आणि जम्मू-काश्मीरमधील समस्या सुटत नाहीत तोपर्यंत अशा हल्ल्यांचे प्रमाण वाढतच राहील.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन लष्करी पोर्टर शहीद झाले, तर आणखी एक सैनिक आणि एक कुली जखमी झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, फारूक अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “या राज्यात असे हल्ले होतच राहतील. ते कोठून आले हे तुम्हाला माहिती आहे, आणि जोपर्यंत या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही.”
हे देखील वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये LOC जवळ पुन्हा दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद, 7 जणांचा मृत्यू
आम्ही पाकिस्तानचा भाग होणार नाही- फारूक अब्दुल्ला
अब्दुल्ला यांनी पुढे म्हटले की, “आम्ही पाकिस्तानचा भाग होणार नाही. मग ते असे का करत आहेत? आमचे भविष्य उध्वस्त करण्यासाठी? आम्हाला आणखी गरीब करण्यासाठी?” त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या दुर्दशेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि हिंसाचार थांबवून भारताशी मैत्रीचा मार्ग शोधण्याचे आवाहन केले. तसेच फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “ज्यांनी बलिदान दिले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागतो.”
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानाबद्दल विचारले असता, अब्दुल्ला म्हणाले, “विधानसभा जनतेसाठी काम करणार आहे. आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार पूर्ण राज्याचा दर्जा देईल जेणेकरून सरकार लोकांसाठी काम करू शकेल.” या संपूर्ण चर्चेतून, फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, भारत-पाक संबंध सुधारल्याशिवाय आणि काश्मीरमधील समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय अशा हिंसाचाराच्या घटनांना आळा बसणार नाही.