बिना : सागर जिल्ह्यातील बिना येथे कोळसा भरलेल्या मालगाडीच्या इंजिनला अचानक आग लागली. काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरू लागले. विशेष म्हणजे आग लागताच लोको पायलट ट्रेनमधून खाली उतरल्याने त्याचा जीव वाचला. बीना-कोटा रेल्वे मार्गावरील सेमरखेडी स्थानकाजवळ ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बीना रिफायनरीसह बीना पालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. सुमारे 35-40 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आल्याचे बीना तहसीलदार सुनील शर्मा यांनी सांगितले. इंजिन पूर्णपणे जळून खाक झाल्याने आग किती तीव्र होती, याचा अंदाज येतो. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कोळशाने भरली होती मालगाडी
कोळशाने भरलेली ही मालगाडी बीना येथून गुनाच्या दिशेने जात होती. तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमरखेडी रेल्वे स्थानक ओलांडताच गाडीच्या इंजिनला अचानक आग लागली. हे पाहून लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली आणि खाली उतरले.