बंगळुरू : बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटाने देशभरात खळबळ उडाली होती. या स्फोटात नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा आयईडी स्फोट कोणी घडवून आणला, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, याबाबत सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आरोपी 25 ते 30 वर्षांचा असल्याचे समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये एक महिला सहा जणांसह बसली होती. त्यानंतर त्याच्या मागे ठेवलेली बॅग फुटली. प्राथमिक तपासात आरोपी हा २५ ते ३० वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. तो रेस्टॉरंटजवळ बसमधून खाली उतरताना आणि चालत येताना दिसत आहे.
आरोपी तरुणाच्या चेहऱ्यावर मास्क
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंट आणि आसपासच्या भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता तरुणाच्या चेहऱ्यावर मास्क होता. तो कॅफेत आला. येथे त्याने कॅश काउंटरवर पैसे दिले आणि रवा इडलीचे टोकन घेतले. इडली खाल्ल्यानंतर डस्टबिनजवळ पिशवी टाकून तो बाहेर गेला. आणि त्यानंतर स्फोट झाला.
रामेश्वरम कॅफे हे बेंगळुरूमधील प्रसिद्ध कॅफे आहे. हे कॅफे व्हाईटफिल्डच्या ब्रूकफील्ड परिसरात आहे, जे शहराचे व्यवसाय केंद्र आणि प्रसिद्ध टेक हब आहे. येथील आयईडी स्फोटाने पुण्यातील जर्मन बेकरी घटनेची आठवण ताजी झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हा आयईडी स्फोट असल्याचे बोलले जात आहे. तपास सुरू आहे. कॅफेच्या कॅशियरची चौकशी केली जात आहे. कारण एका व्यक्तीने कॅशियरकडून टोकन घेतले आणि जेवण घेतले. त्यानेच बॅग ठेवली होती, असे समोर आले आहे.
कर्नाटकचे डीजीपी आलोक मोहन म्हणाले की, हा आयईडी स्फोट होता. यामागे कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटाबाबत एनआयए आणि आयबीला माहिती देण्यात आली आहे.
Web Title: Footage of rameshwar cafe blast surfaced accused in camera ate idli and left the bag read in detail nryb