
योगी सरकारची भेट! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राजधानी लखनऊमध्ये माफियांच्या ताब्यातील मौल्यवान जमिनीवर उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल गृहनिर्माण योजनेच्या ७२ फ्लॅट्सचे लोकार्पण केले. डीजीपी निवासस्थानासमोर असलेल्या एकता वन, जियामऊ, डालीबाग येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या व वाटपपत्र सुपूर्द केले. कार्यक्रमापूर्वी त्यांनी या नव्या घरांची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “ही जमीन एकेकाळी माफियाच्या ताब्यात होती. आज येथे उभे असलेले गरीबांचे घर समाजाला नवा संदेश देत आहे. जे माफिया कधी राज्यघटनेचा अपमान करत होते, अधिकाऱ्यांना धमकावत होते आणि सरकारांना वाकवण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे हेच हाल होणार. समाजाची जमीन हडप करणाऱ्यांना आता माफी मिळणार नाही. उत्तर प्रदेशात माफियाच्या संपत्तीतून आता गरीबांसाठी घरं उभी राहतील. सरकारी जमिनीवर कोणीही माफिया किंवा गुंड कब्जा केला तर त्याच्यावर प्रयागराजप्रमाणेच कठोर कारवाई केली जाईल.”
योगी म्हणाले, “जे लोक सत्ता गमावून माफियांच्या कबरींवर फातिहा वाचायला जातात, त्यांची सहानुभूती गरीबांशी किंवा मुलींबरोबर नाही, तर गुन्हेगारांशी आहे. उत्तर प्रदेशातील जनता आता अशा लोकांचे खरे चेहरे ओळखते आणि त्यांना योग्य उत्तर देईल. आता राज्यात माफियावृत्ती कधीही फोफावणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “गोमती नदीकाठावरील क्षेत्र काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या राजवटीत मॉल्स आणि अनधिकृत इमारतींनी व्यापले होते, त्यात काही बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकही होते. आज त्या ठिकाणी हरित वनक्षेत्र तयार झाले आहे. आता असा विकासच राज्यात घडणार आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “माफिया आणि गुंडांनी लुटून साठवलेला पैसा जप्त करून तो गरीबांमध्ये वाटला पाहिजे. जे अजूनही माफियांप्रती सहानुभूती दाखवतात, ते स्वतःच्याच संस्थांची हानी करत आहेत. हे तेच माफिया आहेत जे भारताच्या संविधानाचा आणि कायद्याचा अपमान करीत होते. अधिकारी त्यांच्यासाठी काहीच नव्हते, गुन्हेच त्यांचा धर्म होता. त्या काळातील सत्ताधारी पक्ष त्यांच्यासमोर नतमस्तक होत, गयावया करत होते. मात्र आज उत्तर प्रदेशाची कायदा-सुव्यवस्था इतरांसाठी आदर्श ठरत आहे.”
योगी यांनी सांगितले की, “६० लाखांहून अधिक गरीबांना प्रधानमंत्री आवास योजना आणि मुख्यमंत्री आवास योजनेतून निवारा मिळाला आहे. समाजवादी पक्षाच्या काळात डीजीपी कार्यालयासमोर माफियाने कब्जा करून आलिशान कोठी बांधली होती, आणि कोणीही त्याला थांबवले नाही. पण जेव्हा त्या माफियावर कारवाई सुरू केली, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कित्येकांनी बाजू घेतली.”
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवकांसाठी सरदार वल्लभभाई पटेल एम्प्लॉयमेंट सेंटर उभारले जातील, जिथे क्लस्टर विकसित करून स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व ७५ जिल्ह्यांत या उपक्रमावर युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.”
योगी म्हणाले, “२०१७ पूर्वी ज्या जागांवर माफियांचा कब्जा होता, तिथे आज गरीबांची घरे बांधली जात आहेत. हे आमच्या ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचे फलित आहे.” त्यांनी सांगितले की, “लखनऊच्या सर्वाधिक प्राइम लोकेशनवर असलेले हे फ्लॅट बाजारात सुमारे एक कोटी रुपयांचे आहेत, परंतु सरकारने ते केवळ १०.७० लाख रुपयांत उपलब्ध करून दिले आहेत.”
पर्यावरण संरक्षणाचा संदेश: कार्यक्रमादरम्यान सीएम योगींनी प्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात केली. त्यांना रुद्राक्षाचे रोप आणि श्रीरामाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यांनी सांगितले, “कार्तिक पूर्णिमेच्या शुभदिनी झालेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि समाज पुनर्निर्माणाचा प्रतीक आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “आजचा उत्तर प्रदेश दंगली आणि गुन्ह्यांचा नव्हे, तर गुंतवणुकीचा आणि संधींचा प्रदेश बनला आहे. २०१७ पूर्वी सणासुदीच्या काळात कर्फ्यू लागू होत असे, आता गुंतवणूकदार येथे उद्योग उभारण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प प्रत्यक्षात उतरले आहेत आणि ५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. एकूण ४५ लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावांपैकी मोठा हिस्सा आम्ही प्रत्यक्ष अंमलात आणण्यात यशस्वी झालो आहोत.”
सरदार वल्लभभाई पटेल गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०.७० लाख रुपये किंमतीचे हे फ्लॅट तीन ब्लॉक्समध्ये ‘ग्राउंड प्लस थ्री’ रचनेत उभारले आहेत. प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ ३६.६५ चौ.मी. आहे. ५७०० अर्जांमधून लॉटरी प्रक्रियेद्वारे ७२ कुटुंबांची निवड करण्यात आली. या योजनेचा एकूण क्षेत्रफळ २३२१ चौ.मी. असून ८ कोटी रुपयांच्या खर्चाने ती पूर्ण करण्यात आली आहे.