हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; तब्बल 435 रस्ते बंद, 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
शिमला : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. त्यात हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेला चंदीगड-मनाली महामार्ग बंद करावा लागला. मंडी जिल्ह्यातील धोकादायक परिस्थितीमुळे हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
चंदीगड-मनाली महामार्ग लष्करी पुरवठ्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा मानला जातो. हिमाचलमध्ये, मंडी, बिलासपूर, हमीरपूर आणि सोलन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि इतर सात जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसादरम्यान, एका पिकअप ट्रकवर दगड पडला आणि त्याचा चालक आणि एक प्रवासी जखमी झाला. माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी लुहरी जाजर रस्त्यावरील कानी नालाजवळ हा अपघात झाला. चालक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून पिकअप ट्रकमध्ये दूध घेऊन परतत होता.
जखमींची ओळख विक्रांत आणि राजेश अशी झाली आहे. रामपूरजवळील खानेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ४३५ रस्ते पावसामुळे बंद आहेत. त्यापैकी २६० रस्ते आपत्तीग्रस्त मंडी जिल्ह्यातील आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (SEOC) नुसार, ५३४ वीज वितरण ट्रान्सफॉर्मर आणि १९७ पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला आहे.
अनेक रस्ते करण्यात आले बंद
मंडी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २१, मंडी-कुल्लू रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग १५४ (मंडी-पठाणकोट) बंद आहे. सिरमौर जिल्ह्यातील शिलियाजवळ राष्ट्रीय महामार्ग ७०७ (हटकोटी ते पाओंटा साहिब) देखील बंद आहे. राज्याच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला.
अनेक भागांत मुसळधार पाऊस
सोमवारी संध्याकाळपासून अंब येथे ९४.२ मिमी पाऊस पडला, त्यानंतर भरारी (६७.८ मिमी), बार्थिन (५८.२ मिमी), स्लॅपर (५१ मिमी), नादौन (४८.५ मिमी), जोगिंदरनगर (४८ मिमी), अघर (४६.२ मिमी), कसौली (४४ मिमी), देहरा गोपीपूर (४३ मिमी), घाघूस (४२.६ मिमी), मुरारी देवी (४२ मिमी) आणि मालरावं (४१ मिमी) येथे पाऊस पडला.