कोलकात्यात मुसळधार पाऊस; अनेक भागांत गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, रस्तेही पाण्याखाली, अलर्टही जारी
कोलकाता : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या या मुसळधार पावसात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. मुसळधार पावसात या चौघांनाही विजेचा धक्का बसला. आतापर्यंत मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. यामध्ये बेनियाकपूर येथील फिरोज अली खान (वय ५०), नेताजी नगर येथील प्रांतोष कुंडू (वय ६२) आणि इक्बालपुल येथील मुमताज बीबी (वय ७०) यांचा समावेश आहे. ओळख पटलेली नसलेल्या आणखी एका व्यक्तीचा गरियाहट येथे मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रावर घोंघावतेय मोठं संकट! राज्यात पाऊस थैमान घालणार; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
कोलकात्याचे महापौर आणि नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले की, ‘सध्या शहरात विजेचा धक्का बसून चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यातील बहुतेक भाग सध्या पाण्याखाली आहेत आणि महानगरपालिका कर्मचारी पाणी काढून टाकण्यासाठी सतत काम करत आहेत’.
मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली
पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. घरांमध्ये आणि निवासी संकुलांमध्येही पाणी शिरले. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोलकात्यातील गरिया कामदहरी भागात सर्वाधिक पाऊस पडला, जिथे काही तासांतच ३३२ मिमी पाऊस पडला. त्यानंतर जोधपूर पार्कमध्ये २८५ मिमी, कालीघाटमध्ये २८० मिमी, टोप्सियामध्ये २७५ मिमी आणि बालीगंजमध्ये २६४ मिमी पाऊस पडला. उत्तर कोलकात्यातील थंटानिया भागातही १९५ मिमी पाऊस पडला.
रेल्वेसेवा विस्कळीत
मुसळधार पावसामुळे अनेक भागात तीन फूटांपर्यंत पाणी साचल्याचे वृत्त आहे. यामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या. याव्यतिरिक्त, मेट्रो ऑपरेशन्समध्येही समस्या आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, शहीद खुदीराम आणि मैदान स्थानकांवर मेट्रो सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.