Rain Update: देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. दरम्यान आज देशभरात अनेक ठिकाणी वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आज कोण कोणत्या राज्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे,
राजधानी दिल्लीत देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात आज पावसाचा जोर वाढू शकतो. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंड राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देहराडुन, नेनीताल आणि बागेश्वर या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उद्या आणि परवा या राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राजस्थानमध्ये कसे असणार वातावरण?
राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. असाच पाऊस पुढे काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
हवामान विभागाने उत्तर प्रदेश, दक्षिण भारत, पूर्व व उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा
गेले दोन ते तीन दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस राज्यात सक्रिय होणार आहे. आज सकाळपासून पुणे शहरात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणेशोत्सवात पाऊस मुंबई, पुणे शहरांसह अन्य जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागानुसार, घाट माथा आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात पाऊस हजेरी लावणार असे सध्या दिसून येत आहे. मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Alert: कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा; ऐन गणेशोत्सवात झोडपणार, मुंबई, पुण्यात तर…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.