Monsoon alert: गेल्या दोन दिवसांपासून देशभरात देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारतात देखील पावसाचा जोर वाढला आहे. पुढील २४ तासांसाठी देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज कोणकोणत्या राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे, ते जाणून घेऊयात.
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, सौराष्ट्र, कच्छ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत यमुना नदीचे पाणी काही सखल भागात शिरण्यास सुरुवात झाली आहे. हरियाणामधील हाथीनिकुंड धरणातून यमुना नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत देखील आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हरियाणातून यमुना नदीत पाणी सोडल्याने यमुना नदी इशारा पातळीच्या वरून लवकरच वाहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काय स्थिती?
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अनेक ठिकाणी महामार्ग आणि अन्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात जोरदार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला
महाराष्ट्रातील सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना तर पावसाने अक्षरशः धुवून काढले आहे. अति ते अति मुसळधार पाऊस या भागात कोसळत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि पुणे, सातारा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील काळ रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण जवळपास भरल्याने पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यात तर पावसाची संततधार सुरु आहे. तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच मच्छिमार बांधव आणि अन्य नागरिकांनी देखील समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.