

भारतात एका खासदारामागे सरासरी 26.3 लाख मतदारांचे प्रतिनिधित्व
अमेरिकेत 8.02 लाख, तर ब्रिटनमध्ये एका खासदारामागे 1.08 लाख नागरिक
मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेत आंतरराष्ट्रीय आकडेवारी ठरतेय महत्त्वाची
India MP Voters Ratio : भारतात एका लोकसभा खासदारामागे सरासरी 26.3 लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, या तुलनेत अमेरिकेत एका खासदारामागे अवघे 8.02 लाख, तर ब्रिटनमध्ये ही संख्या फक्त 1.08 लाख असल्याचे सांगितले जात आहे.
जगातील प्रमुख लोकशाही देशांमधील लोकप्रतिनिधी आणि मतदारांच्या प्रमाणाची तुलना केल्यास भारतातील प्रतिनिधित्वाचे प्रमाण किती मोठे आहे, हे स्पष्ट होते. सध्या देशात मतदारसंघ पुनर्रचनेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी महत्त्वाची ठरत आहे.
ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सचा एक खासदार सरासरी 1.08 लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. फ्रान्समध्ये हे प्रमाण 1.20 लाख, नेदरलँडमध्ये 1.23 लाख, जर्मनीमध्ये 1.33 लाख, तर इटलीमध्ये 1.47 लाख आहे. कॅनडामध्ये एका खासदारामागे 1.18 लाख, दक्षिण आफ्रिकेत 1.64 लाख आणि ऑस्ट्रेलियात 1.82 लाख नागरिक आहेत.
युरोपमधील काही लहान देशांमध्ये हे प्रमाण आणखी कमी आहे. आइसलँडमध्ये एका खासदारामागे सरासरी 6 हजार 390 नागरिक, तर लक्झेंबर्गमध्ये 11 हजार 460 नागरिक आहेत. फिनलंडमध्ये हे प्रमाण 28 हजार 110, स्वीडनमध्ये 30 हजार 660, आयर्लंडमध्ये 30 हजार 790 आणि नॉर्वेमध्ये 33 हजार 450 आहे.
आशियातील तैवानमध्ये एका खासदारामागे 2.04 लाख, तर जपानमध्ये 2.63 लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व आहे. या तुलनेत भारतातील प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे.
दरम्यान, भारतातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची गरज आणि त्याचे संभाव्य परिणाम यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास लोकसभा आणि विधानसभांमधील प्रतिनिधित्वाचा विस्तार होऊन खासदार व आमदारांवरील मतदारांचे प्रतिनिधित्व करण्याचा भार कमी होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. मात्र, प्रस्तावित परिसीमन विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे.